Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
पुणे

Sambhajiraje News : २०२४ च्या तयारीला लागा, राज्यात आपण सत्ता आणू शकतो; संभाजीराजेंनी सांगितला मार्ग

सरकारनामा ब्यूरो

Swarajya Sanghatna Fight Election 2024 : पाच सुत्री कार्यक्रमातून राज्यात स्वराज्य आणायचे आहे. 'स्व' म्हणाजे तुम्ही. आपल्याला सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे 'राज्य' आणायचे आहे. त्यासाठी २०२४ मधील निवडणुकीच्या तयारीला लागा, असे म्हणत स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रात स्वराज्य संघटना सर्व जागांवर निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी राज्यात कशी सत्ता आणता येईल, याचाही मार्ग सांगितला.

स्वराज्य संघटनेचे (Swarajya Sanghatana) पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुणे येथे पार पडले. यावेळी संभाजीराजे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्वराज्य संघटनेकडून राज्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्याचे सांगितले.

संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, मागच्या वर्षी स्वराज्य संघटनेची घोषणा केली. त्यानंतर आठ महिन्यात संघटना बांधणी, उभी करण्याचे कार्य सुरू होते. आता स्वराज्य म्हणून राज्य पिंजून काढले. यावेळी गाव ते शाखा आणि घरोघरी स्वराज्य ही संकल्पना घेऊन फिरलो. यापूर्वीही वंशज म्हणून फिरलो आता स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून फिरलो. यावेळी राज्यातील जनतेच्या आपल्याकडून आशा, अपेक्षा वाढल्याचे दिसून जाणवले.

आताचे प्रस्थापित, राज्यकर्ते महापुरुषांचे फक्त नाव घेतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून महापुरुषांचे विचार दिसत नाही, असा टोलाही नाव न घेता संभाजीराजे यांनी काही नेत्यांना लगावला आहे. तसेच पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहनही केले.

ते म्हणाले, "निवडून आल्यानंतर नेते आपला रंग दाखवितात. आता रेटून खोटे बोलले जात आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. वेळप्रसंगी ही मंडळी शिवाजीमहाराज, शाहू फुले आंबेडकर, महासंताचे नाव घेतात. मात्र जनतेचा खेळखंडोबा करणे सुरूच ठेवतात. आपल्याला खुळ्यात कढाले जाते. आता पाच वर्षे वाट पाहण्याची गरज नाही. आजही वेळ गेली नाही. या स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करू. सामान्य कष्टकरी, शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी आपल्याला बाहेर पडायचे आहे. २०२४ मधील निवडणुकींच्या तयारीला लागा."

यावेळी संभाजीराजे यांनी राज्यात कशी सत्ता आणता येईल, याबाबतही चर्चा केली. त्यांनी सांगितले की, "आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागा. आपल्याकडे प्रस्थापित लोक नाहीत म्हणून घाबरायची काही गरज नाही. सुसंस्कृत नेता असेल तर निवडून येणारच. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी जो विचार केला होता, त्यातील फक्त दोन टक्के विचार केला तरी आपण राज्यात सरकार आणू शकतो. शिवरायांनी चार-पाच शाहींना बरखास्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ही गोष्ट अशक्य होती. त्यांनी मात्र आपण ते शक्य करू शकतो, असा विश्वास ठेवला. त्यांनी ते करून दाखवले. आता सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासठी शिवरायांच्या विचारांतील दोन टक्केच विचार घेऊ."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT