Pimpri-Chinchwad
Pimpri-Chinchwad Sarkarnama
पुणे

PCMC Budget: महानगरपालिकेचे बजेट सादर; पिंपरी-चिंचवडकरांना मिळाला मोठा दिलासा

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचव़ड महापालिकेचे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे कुठलीच करवाढ, दरवाढ नसलेले शिलकी बजेट आज सादर करण्यात आले. पाच हजार २९८ कोटी ३१ लाख रुपयांच्या या मूळ बजेटमध्ये वर्षाअखेरीस सहा कोटी ३० लाख रुपये शिल्लक राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

एरव्ही दरवर्षी आय़ुक्त हे स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षांना बजेट सादर करतात. मात्र, सध्या पालिकेत प्रशासकीय राजवट सुरु असल्याने स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचे अधिकार प्रशासक असलेल्या आयुक्तांकडे गेले आहेत.

त्यामुळे पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी प्रशासक तथा आयुक्त शेखरसिंह यांना हे बजेट सादर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके, विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनांसह हे बजेट एकूण सात हजार १२७ कोटी ८८ लाख रुपयांचे आहे. गतवर्षी ते सहा हजार ४९७ कोटी दोन लाख रुपयांचे होते. तर, मूळ बजेट हे चार हजार ९६१ कोटी ६५ लाख रुपयांचे होते. म्हणजे यावर्षीचे मूळ बजे़ट हे ३३६ कोटी ६६ लाख, तर एकूण बजेटमध्ये ६३० कोटी ८६ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे.

प्रशासकांची छाप वाटेल, दिसेल असे त्यात काही नाही. उलट आगामी पालिका निवडणुकीच्य़ा तोंडावरील हे करवाढ नसलेले इलेक्शन बजेटच ठरले आहे.

पालिका निवडणूक ही गेल्यावर्षीच १२ मार्च अगोदर अपेक्षित होती. त्यामुळे गतवर्षीही कुठलीच करवाढ नसलेले बजेट सादर झाले होते. यावेळी प्रशासकीय कारभार असल्याने अत्यल्प दरवाढ होईल, असा अंदाज होता.

मात्र, कधीही पालिका निवडणूक होण्याची शक्यता असल्याने गत सत्ताधारी भाजपचे सावट या बजेटवर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही करवाढ नसलेले बजेट सादर झाल्याने शहरवासिय़ांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ते मंजूर होताना प्रशासकीय कारभारामुळे स्थायी समिती सदस्यांच्या उपसुचनांचा पाऊस यावेळी पडणार नाही. कारण प्रशासनाने तयार केलेले हे बजेट तेच मंजूर करणार आहेत.

पालिकेचं एक रुग्णालय हे फक्त ज्येष्ठांसाठीच राखीव करणे आणि शहरासाठी मध्यवर्ती ग्रंथालय़ तयार करणे या दोन नव्या बाबींखेरीज शेखरसिंहाच्या या पहिल्याच बजेटमध्ये कुठलीच नावीण्यपूर्ण योजना नाही. जुने उपक्रम पुन्हा नव्याने मांडण्यात आले आहे.

त्यात पीपीपी तत्वावरील कर्करोग रुग्णालय, मोशीत उभारले जाणारे साडेसातशे खाटांचे रुग्णालय, पालिकेची नवी इमारत या जुन्याच प्रकल्पांची पुन्हा नव्याने घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणण्याचा हा प्रकार झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT