PM  Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
पुणे

पंतप्रधान मोदींनी ठेवला अजितदादांच्या खांद्यावर हात !

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथील सभास्थानी पोचण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर पोहचले.उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व आमदार माधुरी मिसाळ यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेल्या स्वागताचा स्वीकार करीत पंतप्रधान मोदी यांनी पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला अन् समाजमाध्यमावर याचीच चर्चा सुरू झाली.

विमानतळावरील स्वागत स्वीकारून पंतप्रधान मोदी देहूच्या दिशेने रवाना झाले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर ठेवलेले छायाचित्र समाज माध्यमात चर्चेचा विषय ठरले. हे छायाचित्र मोठ्याप्रमाणात व्हायरला झाले. यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली.अजितदादांच्या खांद्यावरील पंतप्रधान मोदींचा हात असाच कायम राहिला तर नजीकच्या काळात राज्यातील राजकीय चित्र बदलू शकते हा या चर्चेचा सूर होता.

ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारची चर्चा समाज माध्यमावर सुरू झाली. हे सरकार केवळ ऐंशी तास टिकले. मात्र, अजित पवार यांच्या खांद्यावर पंतप्रधान मोदी यांचा हात असाच राहिला तर राज्यातील सत्तेची समकिरणे पुन्हा बदलू शकतात, असा या साऱ्या चर्चेचा सूर होता.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी देहूत मोठी तयारी करण्यात आली. वारकरी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच देहू परिसरातील स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सुमारे पावणेदोन वाजता मोदी यांचे देहूत आगमन झाले. शिळा मंदीराचे लोकार्पण झाल्यानंतर मोदी यांचे सभास्थळी आगमन झाले.याआधी पंतप्रधान मोदी यांनी शिळा मंदीर तसेच इंद्रायणी नदी तसेच या संपूर्ण परिसराची पाहणी केली.

सभास्थानी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सभेच्या ठिकाणी पोचणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच सोडण्यात येत आहे. ज्यांनी काळे कपडे परिधान केले आहेत, काळा मास्क किंवा कोणत्याही स्वरूपातील काळे कापड घातलेल्यांना प्रवेश नाकारण्यात येत आहे. पाण्याची बाटली तसेच इतर कोणत्याही वस्तू घेऊन प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT