Narendra Modi -Baburao Pacharne
Narendra Modi -Baburao Pacharne Sarkarnama
पुणे

नरेंद्र मोदींनी पत्र पाठवून केले पाचर्णे कुटुंबीयांचे सांत्वन; ‘जनतेसाठी उठणारा आवाज हरपला’

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : भारतीय जनता पक्षाचे शिरूरचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे (Baburao Pacharne) यांच्या निधनाबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. लोककेंद्रीत समस्यांसाठी कायमच उठणारा आवाज पाचर्णे यांच्या जाण्यामुळे हरपला आहे, असा संदेश पाठवीत पाचर्णे कुटुबीयांचे सांत्वन केले आहे. (Prime Minister Narendra Modi pays tribute to former MLA Baburao Pacharne)

माजी आमदार पाचर्णे यांचे ता. ११ ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पाशा पटेल, महादेव जानकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार ॲड. अशोक पवार, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाचर्णे कुटुबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (स्व.) बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी श्रीमती मालती पाचर्णे यांना वैयक्तिकरित्या शोकसंदेश पाठविला असून, त्यात पाचर्णे यांच्या निधनाबद्दल अतिव दुःख झाल्याचे नमूद केले आहे.

पंतप्रधान या शोकसंदेशात म्हणतात, "बाबूराव पाचर्णे यांना समाजसेवेची अखंड तळमळ होती. त्यांच्या सार्वजनिक जीवनात ते समाज हितासाठी सदैव वचनबद्ध राहिले आणि लोककेंद्रीत समस्यांसाठी नेहमीच आवाज उठवत राहिले. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती महाराष्ट्रातील जनता नेहमीच लक्षात ठेवेल.

बाबूराव पाचर्णे हे कुटुंबासाठी शक्तीस्तंभ होते. ते यापुढे शारीरीकदृष्ट्या आपल्यासोबत नसले तरी त्यांचे आदर्श आणि मूल्ये नेहमीच समाजाला आणि कुटुंबाला मार्गदर्शक राहतील. त्यांच्या जाण्याने कुटुंबाची व त्यांच्या चाहत्यांची खूप मोठी हानी झाली असल्याचेही पंतप्रधानांनी या शोकसंदेशात नमूद केले आहे.

दरम्यान, राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीलाच पाचर्णे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाचर्णे यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रकाशझोत टाकला.

यासंदर्भात बाबूराव पाचर्णे यांचे सुपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे म्हणाले की, माझे वडील बाबूराव पाचर्णे यांनी अफाट जनसंपत्ती कमविली. ते गेल्यानंतर भेटायला येणाऱ्या लोकांकडून त्यांच्याबद्दल जे भरभरून बोलले गेले आणि त्यांच्या जो उहापोह झाला, त्यातून वडीलांविषयीचा माझा आदर कैकपटीने वाढला. भाजप पक्षसंघटनेत त्यांनी दिलेल्या योगदानाची पक्षनेत्यांनी दखल घेतलीच. पण, खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी शोकसंदेश पाठवून त्यांच्याविषयी ज्या सहवेदना व्यक्त केल्या, त्या आम्हाला आयुष्यात पुन्हा भक्कमपणे उभे राहण्याचे व पुढे जाण्याचे बळ देणाऱ्या आहेत. वडीलांचे नाव अधिकाधिक उज्ज्वल करण्याचे यापुढील आयुष्यात मुख्य ध्येय आहे. त्यांनी जमविलेल्या लोकसंग्रहाचा आम्हाला सार्थ अभिमान असून, त्या लोकांच्या सुख-दुःखात पुन्हा पूर्ण क्षमतेने समरस होऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT