Sharad Pawar, Hari Narke Latest Marathi News
Sharad Pawar, Hari Narke Latest Marathi News Sarkarnama
पुणे

महाराष्ट्र 'त्यांच्या' हातात जाऊ द्यायचा का, हे ठरवण्याची वेळ! हरि नरके विरोधकांवर बरसले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सातारा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सादर केलेल्या एका कवितेवरून वाद निर्माण झाला आहे. भाजपकडून (BJP) पवारांच्या भाषणातील काही भाग ट्विट करून त्यावरून टीका केली आहे. याबाबत खुद्द पवारांसह संपूर्ण कविता वाचून दाखवत भाजपला प्रत्युत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादीचे नेतेही भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. आता ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरि नरके हेही विरोधकांवर बरसले आहेत. (NCP Sharad Pawar Latest Marathi News)

महाराष्ट्र या प्रतिगामी, अवैज्ञानिक, वंचितविरोधकांच्या हातात जाऊ द्यायचा का, हे ठरवण्याची ही वेळ आल्याचे सांगत हरि नरके (Hari Narke) यांनी कवितेला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नरके यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे. कवी जवाहर राठोड यांची पाथरवट ही कविता शरद पवार यांच्या तोंडून गेली ३३ वर्षे मी ऐकतोय, असं नरके यांनी म्हटलं आहे.

एवढ्या वर्षात ती कविता कुणाला खटकली नाही. आता अचानक तिच्यावरून गदारोळ केला जातोय. पवारांच्या राजकारणावर मतभेद असू शकतील, पण त्यांचे साहित्यप्रेम, त्यांची वंचित समाजाप्रती असलेली बांधिलकी या सर्वज्ञात नी मला भावणाऱ्या गोष्टी आहेत, असं नरके यांनी स्पष्ट केलं आहे.

राजकीय परिस्थिती कितीही ज्वलनशील असली तरी त्यांचे त्यावरचे भाष्य कमालीचे संयत, मार्मिक नी नेमके असते, असं सांगत नरके यांनी पुढे म्हटलं आहे की, अशा पवारांना एका भटक्याच्या कवितेवरून टार्गेट केले जाणे दुःखद आहे. कुठे चाललोय आपण? डॉ.नरेंद्र दाभोलकर अतिशय संयतपणे बोलायचे, तरीही त्यांची हत्त्या झाली ही महाराष्ट्राला उलट्या पावलांचा प्रवास करायला लावणारी घटना होती.

जी कविता गेल्या ३३ वर्षात कुणाला खटकली नाही, तिच्यावरून जर विरोधी पक्ष गदारोळ करीत असेल तर यापुढे दलित, भटके, आदिवासी, ओबीसी, महिला यांच्या वेदना बोलून दाखवणे हा गुन्हा ठरणार आहे. शिवराय फुले शाहू राजाराम शास्त्री भागवत आंबेडकर साने गुरुजींच्या विचारांवर बंदी येण्याची ही सुरुवात आहे, अशी खंतही नरके यांनी व्यक्त केली आहे.

हे अरिष्ट फक्त पवार किंवा त्यांचा पक्ष, सरकार यांच्यावरचे नाही. जात वर्ग लिंगभाव यांची विषमता पवित्र मानणाऱ्या या शक्ती बलवान होणे हे गेल्या १५० वर्षांच्या प्रबोधन चळवळ आणि विवेकवादी विचारांच्या अंताच्या दिशेने टाकलेले घातक पाऊल आहे. महाराष्ट्र या प्रतिगामी, अवैज्ञानिक, वंचित विरोधकांच्या हातात जाऊ द्यायचा का हे ठरवण्याची ही वेळ आहे, असा निशाणाही नरके यांनी साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT