Maharashtra waiver Farmer sarkarnama
पुणे

Farmers loan Waiver : कर्जमाफीचा दुसरा टप्पा सुरू; पुण्यातील 16 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा; ओटीएसची पहिली यादी जाहीर

One Time Settlement scheme for Maharashtra farmers : शेतकरी कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 16 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला असून, ओटीएस योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे.

Sudesh Mitkar

Pune News Maharashtra farmer loan relief : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकरकमी समझोता योजनेच्या म्हणजेच ओटीएसच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील १६ हजार १७९ शेतकरी पात्र ठरले आहेत. सहकार विभागाने राज्यभरातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून, पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांमध्ये १३ हजार ७५० शेतकरी जिल्हा बँकेचे, तर २ हजार ४२९ शेतकरी व्यापारी बँकांचे आहेत.

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना एकरकमी समझोता योजनेतून दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, दोन लाखांवरील कर्जाची अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्श्यातून भरावी लागणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून ही रक्कम संबंधित बँकेत ३१ मार्च २०२७ पर्यंत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सरकारने २ जून २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे ही कर्जमुक्ती योजना सुरू केली. यामध्ये कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीच्या माध्यमातून आतापर्यंत २५ लाख ८१ हजार शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आधार प्रमाणीकरण झालेल्या २० लाख ७२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

आता दुसऱ्या टप्प्यात ओटीएस योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा बँकांचे ६९ हजार ६३५ आणि व्यापारी बँकांचे १ लाख १८५ शेतकरी अशा एकूण १ लाख ६९ हजार ८२० शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. बँकांकडील कर्जविषयक माहितीचे संगणकीय संस्करण आणि पडताळणी करून ही यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बँकेत स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार

पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्थांच्या शाखा आणि ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गाव, बँक कर्ज खाते, ३१ मार्च २०२६ अखेरची थकबाकी, ओटीएसनुसार निश्चित रक्कम, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनाकडून मिळणारा लाभ यांचा तपशील असेल. शेतकऱ्यांनी यादी तपासून स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँकेत जमा करावी.

एकाच बँकेत एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःची रक्कम कोणत्याही एका खात्यात जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, योजनेनुसार निश्चित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम भरू नये. रक्कम जमा केल्यानंतर बँक संबंधित माहिती पोर्टलवर अद्ययावत करणार आहे. पुढील याद्याही बँकांकडून प्राप्त माहितीच्या पडताळणीनंतर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील बँकनिहाय पात्रतेवर लक्ष

पुणे जिल्ह्यातील १६ हजार १७९ शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जदार आहेत. १३ हजार ७५० शेतकरी जिल्हा बँकेचे, तर २ हजार ४२९ शेतकरी व्यापारी बँकांचे कर्जदार आहेत. त्यामुळे ओटीएस योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जखात्याची स्थिती, थकबाकी आणि भरावयाची रक्कम बँकेकडून तपासून घेणे आवश्यक आहे.

राज्यात अहिल्यानगर आघाडीवर; अमरावती विभागातील सर्वाधिक शेतकरी

ओटीएस योजनेच्या पहिल्या यादीत जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत अहिल्यानगर जिल्हा २६ हजार ७०३ शेतकऱ्यांसह आघाडीवर आहे. अमरावती विभागात २५ हजार ९१७, पुणे जिल्ह्यात १६ हजार १७९, नागपूर विभागात १२ हजार २ शेतकरी पात्र ठरले आहेत. नाशिक जिल्ह्यात ९ हजार ९६६, सांगलीत ७ हजार ९४६, जालन्यात ७ हजार १५० आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ हजार ४२९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांनी पहिल्या यादीतील आपले नाव आणि कर्जाचा तपशील तपासून मुदतीत स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरल्यास दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT