Pune voter-list revision under SIR reportedly sees 45% of voter names excluded, raising questions over booth-level political preparedness. Sarkarnama
पुणे

Pune BJP : भाजपला बालेकिल्ल्यांतच मोठा धक्का : मजबूत बूथ यंत्रणेच्या चिंधड्या; ४५% पेक्षा जास्त मतदार यादीबाहेर

SIR Pune BJP Booth Machinery Fails : भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे पुण्यातील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपची बुथ यंत्रणा निष्पळ ठरल्याची चर्चा आहे.

ब्रिजमोहन पाटील

Pune News : भाजपची बूथ यंत्रणा खूप मजबूत असल्याचा दावा पक्षाकडून केला जातो. पण विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर हा दावा फोल ठरला असल्याचे समोर आले आहे. भाजपचे बालेकिल्ले असलेल्या खडकवासला, कोथरूड आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील ४५ टक्क्यांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळली गेली आहेत. शिवाजीनगरमध्ये ४४.४७ टक्के मतदार प्रारूप यादीत नाहीत.

पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी ‘एसआयआर’च्या कामाचा आढावा घेतला. त्यात प्रभावीपणे काम केलेले मतदारसंघ आणि सुमार काम झालेल्या मतदारसंघांची यादी राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातील उपस्थित सुमारे तीन हजार पदाधिकाऱ्यांपुढे वाचून दाखवली. प्रभावी काम झालेल्या यादीत पुण्यातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. पण सुमार काम झालेल्या मतदारसंघाच्या यादीत पुण्यातील चार मतदारसंघांची नावे असल्याचे समोर आले.

बैठका घेऊनही प्रभावी काम नाही

एसआयआर’च्या तयारीसाठी भाजपच्या नेत्यांनी पुण्यात मतदारसंघनिहाय, मंडळनिहाय अनेक बैठका घेतल्या. नगरसेवकांना देखील या कामात गांभीर्याने लक्ष देण्याची सूचना केली होती. नगरसेवकांना संघटनेसाठीही काम करण्याची तुमची जबाबदारी आहे, असे बजावण्यात आले होते. प्रत्यक्षात पूर्ण क्षमतेने भाजपची यंत्रणा अनेक मतदारांपर्यंत पोहोचली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

पुण्यातील चार मतदारसंघ 'त्या' यादीत

पुण्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ असून, ‘एसआयआर’पूर्वी ३४ लाख ६५ हजार ३०५ मतदार होते. प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर यापैकी १४ लाख ८५ हजार ६० (४२.८५ टक्के) मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. नऊपैकी चार मतदारसंघ पुण्यातील प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ‘एसआयआर’चे काम चांगले झाले नाही, अशा नऊ मतदारसंघांची नावे जाहीर केली. त्यात पुण्यातील चार मतदारसंघ होते.

यात हडपसरमध्ये सहा लाख ५१ हजार ४७३ मतदारांपैकी दोन लाख ९८ हजार ५४६ (४५.८३ टक्के) मतदार प्रारूप यादीत नाहीत. खडकवासल्यात पाच लाख ९७ हजार ११४ पैकी दोन लाख ७८ हजार ४४९ (४६.६३ टक्के), कोथरूडमध्ये चार लाख ४८ हजार ५५ पैकी दोन लाख ७ हजार २७९ (४६.२६ टक्के) आणि शिवाजीनगरमध्ये दोन लाख ९२ हजार ८५१ मतदारांपैकी एक लाख ३० हजार २३३ (४४.४७ टक्के) मतदार प्रारूप यादीत नसल्याचे समोर आले आहे.

अन्य मतदारसंघातही मोठे आव्हान

पुण्यातील आठपैकी केवळ चार मतदारसंघांत कमी काम झाले असे नाही, तर अन्य मतदारसंघांमध्येही स्थिती फारशी समाधानकारक नाही. पर्वती मतदारसंघातील ४०.९५ टक्के, पुणे कॅन्टोन्मेंटमधील ४०.४६ टक्के, वडगावशेरीत ३९.३४ टक्के मतदार वगळले गेले आहेत. सर्वात कमी ३२.५२ टक्के मतदार हे कसबा पेठेतून वगळले गेले आहेत. आपल्या बालेकिल्ल्यातीलच भागातील नावे वगळली गेल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. पक्षाला हक्काचा मतदार पुन्हा जोडून घेण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे.

मतदारांचे स्थलांतर, इमारतींच्या पुनर्विकासाच्या कामामुळे न भेटलेले मतदार, दोन ठिकाणी नावे असलेल्यांनी गावाकडील मतदारयादीत नाव ठेवण्यास दिलेले प्राधान्य यांसह अन्य कारणांमुळे मतदारांची नावे वगळली गेली आहेत. शासनाचे बीएलओ व आमच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन ‘एसआयआर’साठी प्रयत्न केले. आता ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत त्यांची नावे यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी सहा क्रमांकाचा अर्ज भरून घेण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व नगरसेवकांची यंत्रणा कामाला लावू. धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT