Pune BJP Reshuffle Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis: पुणे भाजपमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत! निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना नारळ, नव्या चेहऱ्यांना संधी?

Pune BJP Reshuffle News: विधान परिषद निवडणुकीतील कामगिरीनंतर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप संघटनेत फेरबदलांचे संकेत आहेत. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची जबाबदारी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Sudesh Mitkar

Pune BJP Reshuffle News: विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातील त्रुटी उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलांचे संकेत मिळू लागले आहेत. संघटनेतील मरगळ झटकून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी व्यापक फेररचना करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे, निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची जबाबदारी बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षांतर्गत विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना केवळ पदे मिळविण्यापुरते मर्यादित न राहता, पदाधिकारी आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्याचे संकेत दिले आहेत. या प्रक्रियेत निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची जबाबदारी बदलण्यापासून संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यापर्यंतचे निर्णय होऊ शकतात असं बोललं जात आहे.

विषय समित्यांमध्येही बदलाचे वारे

पुणे महापालिकेतील विषय समित्यांच्या रचनेतही पुढील काही दिवसांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. समित्यांमधील पदाधिकारी, सभापती आणि सदस्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षपातळीवर विचार होऊ शकतो. याशिवाय पक्षाच्या कोअर कमिटीतील मतभेद मिटवून सर्व नेत्यांनी संघटनात्मक कामाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक रचनेत नेमके कोणते बदल होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरसेवकांचेही होणार रिपोर्ट कार्ड

पुण्यातील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. नगरसेवकांनी केवळ पदासाठी नव्हे, तर अर्धी पक्षासाठी आणि अर्धी जनतेसाठी केलेल्या कामाचा हिशेब द्यावा, अशा शब्दांत त्यांनी कामगिरीचे महत्त्व अधोरेखित केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदार नोंदणीपासून प्रचारापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेण्याचे संकेतही त्यांनी दिले. त्यामुळे आता नगरसेवकांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन होण्याची शक्यता आहे.

२१ आमदार, तीन खासदार; तरी संघटनेत नाराजी

पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे २१ आमदार आणि तीन खासदार आहेत. त्यामध्ये चार मंत्र्यांचाही समावेश आहे. एवढे मोठे राजकीय बळ असतानाही विधान परिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे राजकीय ताकदीच्या तुलनेत संघटनात्मक पातळीवर काम झाले का, याचा शोध पक्षाकडून घेतला जात असल्याचे चित्र आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद असतानाही मतदार नोंदणी आणि निवडणूक व्यवस्थापनाच्या पातळीवर अपेक्षित काम झाले नसल्याची नोंद पक्षांतर्गत चर्चेत घेतली जात आहे. जबाबदार पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचा हिशेब घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक संघटनेतील बदलांना वेग येऊ शकतो.

मंत्रिमंडळातही फेरबदलाची चर्चा?

पक्ष संघटनेतील फेरबदलांच्या चर्चेबरोबरच राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांचीही चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास नव्याने निवडून आलेल्या आमदारांनाही संधी मिळू शकते. मात्र, मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडून संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात या प्रक्रियेत कोणाची जबाबदारी कायम राहणार आणि कोणाला नव्याने संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT