Deputy CM Ajit Pawar addresses the media amid rising political tension over criminal background candidates in Pune municipal elections. Sarkarnama
पुणे

Pune Politics : 'त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला...'; गुन्हेगारांच्या उमेदवारीवरून मुरलीधर मोहळांनी डिवचलं, अजितदादांनी थेट मुद्द्यालाच हात घातला

NCP Ajit Pawar vs Pune BJP : पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून भाजप नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीवादीवर निशाणा साधला होता. तर भाजपने हत्येचे आरोप असलेल्या रोहिदास चोरघेच्या पत्नीला प्रतिभा चोरघेला उमेदवारी का दिली? असा सवाल विचारला होता.

Jagdish Patil

Pune News, 03 Jan : एकीकडे पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे, तर दुसरीकडे राज्यकर्तेच या गुन्हेगारांना मोठं करत असल्याचं महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतंय. तर 'समोरच्या पक्षाने गुडांना उमेदवरी दिली म्हणून आम्ही दिली' असा युक्तीवाद देखील राज्यातील नेते करताना दिसत आहेत.

तर याच मुद्द्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप विरोधात लढत आहे. साहजिकच आता हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांचे विरोधक असल्याने ते समोरील पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

नुकतंच पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून भाजप नेते तथा मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीवादीवर निशाणा साधला होता. तर भाजपने हत्येचे आरोप असलेल्या रोहिदास चोरघेच्या पत्नीला प्रतिभा चोरघेला उमेदवारी का दिली? असा सवाल विचारला असता मोहोळ यांनी अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून भाष्य केलं.

'पालकमंत्री एकीकडे पुणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात आणि दुसरीकडे शहराच्या पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत त्यांचे उमेदवार पाहिले तर ते कोणत्या तत्वात बसतं.' असा सवाल करत, अजित पवारांनी गुंड आंदेकरांच्या घरात उमेदवारी दिल्यावरून मोहोळ यांनी टोला लगावला आहे. आता त्यांच्या याच वक्तव्यावरून अजित पवारांनी भाजपवर जोरदार हल्लोबोल केला आहे.

'अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली आहे, अनेक रस्त्यावर अतिक्रमण झालंय, तिथं हफ्तेखोरी सुरु असल्याचं दिसतं. गेल्या नऊ वर्षात भाजपच्या सत्ता काळात हा असला विकास झाला? टेंडरमध्ये रिंग केली जाते, दादागिरी केली जाते. मी पुरावे देईन, पुराव्या शिवाय मी बोलणार नाही, कोणावर बिनबुडाचे आरोप करणार नाही', असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.

तसंच, गुंड निलेश घायवळचं नाव न घेता, एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला? त्यांनीसुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याची पण माहिती काढा, असं म्हणत पवारांनी मोहोळ यांनी निलेश घायवळला विदेशात जायला मदत केल्याचा दावा नाव न घेता केला.

शिवाय पुण्यातील भाजपची आणि माझी यादी दाखवतो. कोणाचे उमेदवार कसे आहेत हे पाहा, मग सगळं स्पष्ट होईल, असं म्हणत भाजपने देखील गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून टीका केली. दरम्यान, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या मुलावर गुन्हे दाखल आहेत, या काँग्रेसच्या आरोपवर बोलताना अजित पवार म्हणाले, गुन्हे दाखल आहेत, पण त्यात तो दोषी ठरलाय का? माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले, पण ज्यांनी ते आरोप केले त्यांच्यासोबत मी बसलोय ना? मग आरोप म्हणजे दोषी नाही, असं म्हणत अजित पवारांनी भाजपला टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT