Pune News : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत 'हिंदू हिंसक' आहेत, असं वक्तव्य केलं होतं. या विरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपकडून राहुल गांधींचा विविध पातळ्यावरती निषेध नोंदवण्यात येत आहे.
भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे ( Dhiraj Ghate ) यांनी देखील शहर परिसरात बॅनर्स लावून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मात्र, याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांच्याबाबत धक्कादायक विधान केलं आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात धीरज घाटे यांनी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे बॅनर्स लावले आहेत. भाजपकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर फुली मारण्यात आली आहे. तसेच, या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांच्या बाजूला स्वामी विवेकानंद यांचा फोटो लावण्यात आला आहे. याखाली कॅप्शनमध्ये, 'खबरदार हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल,' असा मजकूर छापण्यात आला आहे. याच बॅनरवरून घाटे यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे.
अरविंद शिंदे ( Arvind Shinde ) म्हणाले, "भाजपवाले ( bjp ) हिंदू नाहीत, हे राहुल गांधींना सांगायचं होतं. पण, कोणताही मुद्दा नसल्याने शब्दांची 'फिरवा-फिरव' करून 'नरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. लोकांनी त्याला भीक घातली नाही. 'हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही. तो सर्व समाजांचा आदर करतो,' हे राहुल गांधींना सांगायचं होतं."
"ज्या भाजप शहराध्यक्षांनी हे बॅनर्स लावले आहेत, ते स्वतः पोलिस संरक्षण घेऊन फिरतात. त्यांचा मर्डर होणार होता. शहरामध्ये एकटे फिरू शकत देखील नाही. तू कधी मरू शकशील हे माहीत नाही. कारण तुझी कर्म तशी आहेत. कर्म तुम्ही कराल ते तुम्हाला भोगावं लागतं," अशी टीका अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांच्यावर केली.
अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पुणे शहरातील राजकारणात मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.