Pune Congress Changes: पुणे शहरात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी पक्षाने आता पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने पुणे शहर पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, तब्बल ५१ पदाधिकाऱ्यांचा विविध पदांवर समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासोबतच कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
पुणे शहर पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसने संघटनात्मक पुनर्रचनेचा भाग म्हणून पुणे शहराची पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांत विभागणी केली आहे. पूर्व पुण्याची जबाबदारी प्रशांत जगताप यांच्याकडे, तर पश्चिम पुण्याची जबाबदारी माजी आमदार दीप्ती चौधरी यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्यभरातील संघटनात्मक पुनर्रचनेत पुण्याच्या या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुणे महापालिकेच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व असताना काँग्रेसला स्वतःची संघटनात्मक ताकद वाढविण्याची गरज आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपला विरोध करताना नागरिकांचे प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि प्रभागनिहाय संघटन यावर काँग्रेसला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. त्यामुळे केवळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून न थांबता, त्यांना प्रत्यक्ष कामाला लावण्याची जबाबदारी आता पक्ष नेतृत्वावर असणार आहे.
नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस, सचिव आणि संघटक सचिव अशा विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उपाध्यक्षपदी २२, खजिनदारपदी एक, सरचिटणीसपदी १५, सचिवपदी २०, संघटक सचिवपदी २ आणि प्रसिद्धी प्रमुखपदी १ पदाधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्यांमुळे पूर्व पुण्यातील पक्षसंघटनेला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विविध भागांतील कार्यकर्त्यांना संधी देत पक्षाचा जनसंपर्क वाढविण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर राहणार आहे.
प्रशांत जगताप यांच्याकडे पुणे शहर पूर्व जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर आता जम्बो कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र, काँग्रेससमोर महापालिकेतील राजकीय आव्हानांसोबतच कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे, स्थानिक पातळीवर पक्षाचा प्रभाव वाढविणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे ही आव्हाने असणार आहेत. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरून पक्षाच्या कामाला किती गती देतात, यावर पुणे शहर पूर्व काँग्रेसच्या पुढील राजकीय वाटचालीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.