Pune DCC Bank Election | Kul vs Thorat Sarkarnama
पुणे

Pune DCC Bank Election : आमदाराची पत्नी विरुद्ध माजी आमदार? पुणे जिल्हा बँकेच्या आखाड्यात पुन्हा ‘कुल-थोरात’ आमनेसामने

Pune District Central Cooperative Bank : दौंड तालुक्यातील राहू विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून कांचन कुल यांची पीडीसीसी बँकेच्या मतदार प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अभिनंदनाचे पोस्टरही झळकले. मात्र, मतदार प्रतिनिधी म्हणून निवड होणे आणि जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी अधिकृत उमेदवारी मिळणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत.

Sudesh Mitkar

Pune News, 24 Sep : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सदस्य संस्थांच्या प्रतिनिधी निवडीचे ठराव मागविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दौंड तालुक्यात पुन्हा एकदा कुल विरुद्ध थोरात असा राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी संधी मिळणार का, याची चर्चा सध्या दौंडच्या सहकार वर्तुळात जोर धरू लागली आहे.

दौंड तालुक्यातील राहू विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून कांचन कुल यांची पीडीसीसी बँकेच्या मतदार प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर अभिनंदनाचे पोस्टरही झळकले. मात्र, मतदार प्रतिनिधी म्हणून निवड होणे आणि जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी अधिकृत उमेदवारी मिळणे या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे कांचन कुल यांच्या उमेदवारीवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

दौंडच्या राजकारणात आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांची पकड काही काळ ढिली झाल्याचे चित्र होते. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलताना दिसत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये एकीकडे थोरात यांचा प्रभाव दिसला तर दुसरीकडे पंचायत समिती निवडणुकीत कुल यांनी वर्चस्व राखले.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक दौंडसाठी महत्त्वाची ठरणार आहे. माजी आमदार रमेश थोरात यांचा पीडीसीसी बँकेच्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभव हा त्यांच्या गटासाठी महत्त्वाचा घटक आहे. २०२१ मध्ये ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. तसेच त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि विकास सेवा सोसायट्यांमधील संपर्क यामुळे थोरात गटाची भूमिका यंदाही निर्णायक ठरू शकते.

दुसरीकडे, कांचन कुल यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यास आमदार राहुल कुल यांची राजकीय ताकद या निवडणुकीत पणाला लागणार आहे. त्यामुळे एका बाजूला थोरात यांचा प्रदीर्घ सहकार अनुभव, तर दुसऱ्या बाजूला कुल गटाची राजकीय ताकद असे दोन वेगळे पैलू दौंडच्या निवडणूक आखाड्यात समोर येऊ शकतात. मात्र, कांचन कुल विरुद्ध रमेश थोरात असा थेट सामना निश्चित झाला आहे, असे म्हणणे सध्या घाईचे ठरेल.

कांचन कुल यांना अधिकृत उमेदवारी मिळते का, थोरात गटाची भूमिका काय राहते, अंतिम मतदार प्रतिनिधींची स्थिती काय असते आणि पक्षीय पातळीवर कोणती भूमिका घेतली जाते, यावर दौंडमधील चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दौंडमध्ये पुन्हा एकदा कुल-थोरात संघर्षाची चर्चा सुरू झाल्याने सहकार क्षेत्रासह तालुक्यातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष आता ‘उमेदवारी कोणाला?’ या प्रश्नाकडे लागले आहे.

उमेदवारी कोणाला?

कांचन कुल यांना पीडीसीसी बँकेच्या संचालकपदासाठी अधिकृत उमेदवारी मिळते का, थोरात गट कोणती भूमिका घेतो आणि दौंडमधील विकास सेवा सोसायट्यांचे प्रतिनिधी कोणत्या दिशेने जातात, यावर तालुक्यातील जिल्हा बँक निवडणुकीचे राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे कुल-थोरात संघर्षाची पुढची लढाई जिल्हा बँकेच्या आखाड्यात रंगणार का? याची उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT