<div class="paragraphs"><p>Sunil Chandere-Atmaram Kalate</p></div>

Sunil Chandere-Atmaram Kalate

 

Sarkarnama

पुणे

मुळशीतील राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी कलाटेंसाठी पडद्याआडून सूत्रे हलवली!

सरकारनामा ब्यूरो

पौड (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत मुळशी तालुक्यात 95.23 टक्के मतदान झाले. अ गटात सर्व 45 उमेदवारांनी मतदान केले. तथापि या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाल्यामुळे सुनील चांदेरे विजयी होवून परिवर्तन करणार की आत्माराम कलाटे परंपरा कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pune District Bank election 95 precent vote in Mulshi)

पुणे जिल्हा बॅंकेसाठी रविवारी (2 जानेवारी) सकाळी 8 पासून मतदानाला सुरूवात झाली पहील्या दोन तासातच अ गटातून 26 मतदान झाले. उमेदवार सुनील चांदेरे आणि आत्माराम कलाटे यांनी पहिल्या तासातच मतदान केले. सायंकाळी पाच वाजता अ गटातून 45 , ब गटातून 2 , क गटातून 16 जणांचे मतदान झाले. तिन्ही गटात शंभर टक्के मतदान झाले. ड गटात 18 पैकी 17 जाणांनी मतदानाचा हक्क बजावला. वैयक्तिक सभासदांमध्ये तीनपैकी एकही मतदान झाले नाही. एकंदर 84 पैकी 80 जणांचे मतदान झाले.

मुळशी तालुक्यात 46 विकास सोसायट्या आहेत. तथापि जामगावला प्रतिनिधीच न मिळाल्याने 45 सोसायट्यातील प्रतिनिधीनाच मतदानाचा करण्याची संधी मिळाली. याठिकाणी राष्ट्रवादीचे भोर विधानसभा अध्यक्ष सुनील चांदेरे आणि सलग बावीस वर्षे संचालक राहिलेले आत्माराम कलाटे हे एकमेकांविरोधात रिंगणात होते. त्यात चांदेरे यांना राष्ट्रवादीने पाठींबा देवून पॕनलमध्ये घेतल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून उडी मारून शिवसेनेत गेलेले तसेच अंतिमक्षणी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढविलेले आत्माराम कलाटे हे वैयक्तिक पातळीवर झगडत होते. तथापि निवडणुकीचा चार वेळेचा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनाही विजयाची खात्री आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशामुळे मुळशीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते चांदेरे यांच्यासाठी मत गोळा करण्यात रात्रीचा दिवस करून पळत होते. तथापि राष्ट्रवादीतील काही वरीष्ठ मंडळी मात्र कलाटे यांच्यासाठी पडद्याआडून प्रयत्न करीत होते. दोन्ही बाजूने प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत साम दाम दंड भेद या प्रवृत्तीचाही वापर झाला. मतदारांना काही दिवस निसर्ग ठिकाणी फिरून पर्यटनाचा आणि मद्यासह शाकाहारी, मांसाहारी खाद्यावर ताव मारण्याचा आनंद लुटला. मतदारांचे खिसेही गरम झाले होते. काही प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा वापर झाला. आपल्या बाजूचा प्रतिनिधी पाठविण्यासाठी विविध प्रकारचे राजकारण रंगले. त्यामुळे चांदेरे, कलाटे यापैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT