Pune District Bank Election  Sarkarnama
पुणे

Pune DCC Bank : पुणे जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अशोक पवारांना घेरण्यासाठी माऊली कटकेंची तगडी फिल्डिंग

Pune District Bank Election : माजी आमदार अशोक पवार हे जिल्हा बँकेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असून, त्यांना घेरण्यासाठी आमदार माऊली कटके व समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांना रणांगणात उतरवून बार उडवून देण्याचे नियोजन पक्के झाले आहे.

Jagdish Patil

Pune News, 01 Oct : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर तालुक्यात राजकीय घमासान सुरू झाले आहे. वेगवान घडामोडींतून दैनंदिन राजकीय समीकरणे बदलत चालली आहेत. त्यामुळे मतदारांबरोबरच सर्वसामान्यांमध्ये लढत कशी असेल, याबाबत उत्कंठा वाढत चालली आहे. समीकरणे कशीही झाली; तरी या निवडणुकीतील टोकाच्या चुरशीची परंपरा यावेळीही कायम राहणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे.

माजी आमदार अशोक पवार हे जिल्हा बँकेवर तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असून, त्यांना घेरण्यासाठी आमदार माऊली कटके व समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांना रणांगणात उतरवून बार उडवून देण्याचे नियोजन पक्के झाले असतानाच पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांनीही रणांगणात उडी घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे.

साम, दाम, दंड, भेदासह पूर्ण ताकदीने आणि जबर यंत्रणा लावून निवडणुकीला सामोरे जाण्याची त्यांची हातोटी सर्वपरिचित असल्याने अशोक पवार यांच्यासह सर्वच पातळ्यांवर सावध पवित्रे घेतले जात आहेत. गायकवाड की जासूद याबाबत श्रेष्ठींसह आमदार कटके यांची डोकेदुखी वाढली असताना वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय होतो, याबाबतही उत्कंठा आहे.

या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरवातीला झाल्या. गतवेळी एकसंध राष्ट्रवादीच्या बळावर अशोक पवार यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे म्हणून अशोक पवार यांच्या पाठीशी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मोठी ताकद होती. आंबेगाव मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ४२ गावांतून चाळीसच्या आसपास मतदार असून, गेल्या निवडणुकीत ते निर्णायक ठरले होते.

वळसे पाटील यांचा या मतदारांवर प्रभाव असून, त्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या समन्वयातून यावेळी पुन्हा पवार यांनाच संधी देण्याबाबत विचारविनिमय झाल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय पटलावर असली आणि पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत त्यावर खल चालू असताना आमदार कटके व समर्थकांनी तीव्र विरोध केल्याचे समजते. मात्र, महिलांसाठीच्या राखीव जागेवर त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांना संधी देण्याचीही चर्चा सुरू आहे.

‘पीडीसीसी’ची रणधुमाळी

चुरशीच्या निवडणुकीचा इतिहास शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेसाठी अ वर्गातून १३१ मतदार असून, ब वर्गासाठी आठ; तर क वर्गासाठी ४७ मतदार आहेत. तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणूकीला कायमच चुरस होत असल्याचा इतिहास आहे. अरुण गायकवाड विरुद्ध दत्तोअण्णा ढमढेरे (सन १९९०), अरुण गायकवाड विरुद्ध प्रकाश पवार (१९९५), निवृत्तिअण्णा गवारी विरूद्ध अरुण गायकवाड (सन २०००) या सलग तीन निवडणुकांत निवडून येणाऱ्या संचालकाला प्रतिस्पर्ध्यावर केवळ एका मताने विजय मिळविता आला होता.

त्यानंतर निवृत्तिअण्णा गवारी यांनी एकदा बिनविरोध निवडून येण्याची किमया देखील साधली होती. त्यापुढील निवडणुकीत त्यांनी स्वप्नील गायकवाड यांचा २५ मतांनी पराभव केला, तर गत निवडणुकीत अशोक पवार यांनी चुरशीची परंपरा मोडून काढत एकतर्फी विजय मिळविताना आबासाहेब गव्हाणे यांचा तब्बल ८८ मतांनी पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT