शिरूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीतील धुरळ्यानंतर रविवारी (ता. २ जानेवारी) तब्बल दोन वर्षांनंतर, पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील (pdcc bank election) मतदानाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाचे नेते-कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. ॲड. अशोक पवार (ashok pawar) व बाबूराव पाचर्णे (Baburao Pacharne) या आजी-माजी आमदारांसह तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज मतदान संपेपर्यंत येथील मतदान केंद्रावर ठाण मांडल्याने निवडणुकीत रंगत भरली. (Pune District Bank's election 131 voter give votes)
दरम्यान, मतदानानंतर दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे करण्यात आले आहेत. जिल्हा बॅंक संचालक पदासाठी ‘अ' वर्ग मतदार संघातून, शिरूर तालुक्यातून आमदार ऍड. पवार यांच्यासमोर आबासाहेब गव्हाणे हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे जुने कार्यकर्ते भाजपसह विरोधकांच्या पाठिंब्यावर उभे ठाकले आहेत. पवारांसारख्या बलाढ्य उमेदवारासमोर विरोधी बाजू त्यांनी भक्कमपणे लढविल्याचे निवडणूक काळात दिसून आले. या दोघांतील सरळ लढत चुरशीची होण्याचा अंदाज राजकीय पटलावर व्यक्त केला जात असतानाच "ही निवडणूक एकतर्फी होईल', असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे.
शिरूर तालुक्यात एकूण 132 मतदार असून, एका मतदाराचा ठराव वेळेत न गेल्याने प्रत्यक्षात 131 मतदार होते. त्या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील सेंटर शाळेत मतदान केंद्राची व्यवस्था केली होती. सकाळी दहापर्यंत 11 जणांनी मतदान केले. त्यानंतर अज्ञातस्थळी गेलेले तब्बल पन्नास मतदार एका बसमधून व काही वाहनांतून मतदान केंद्रावर आले, त्यामुळे मतदान केंद्रावर मोठी रांग लागली होती. त्यानंतर इतरांचेही मतदान वेगाने झाल्याने दुपारी साडेबारापर्यंत 111 मतदान झाले. दुपारी साडेतीनपर्यंत उर्वरित मतदारांनीही मतदान केले.
राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार ऍड. पवार हे पत्नी, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, शिरूर तालुकाध्यक्ष रवीबापू काळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पूर्णवेळ मतदान केंद्रावर उपस्थित होते. गव्हाणे यांच्या पाठीशी ताकद उभी केलेले माजी आमदार बाबूराव पाचर्णे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, भाजप कामगार आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे आदी ठाण मांडून बसले होते.
राष्ट्रवादी व भाजपच्या तालुका पातळीवरील सर्वच पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिवसभर मतदान केंद्रावर गर्दी केल्याने व या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे शहरातील मोकळ्या जागा व्यापल्या गेल्याने आज शहरातील वातावरण ‘निवडणूकमय’ झाले होते. ‘अ’ वर्ग मतदार संघातील मतदानाबरोबरच; क व ड वर्ग मतदार संघाचे मतदानही उत्साहात झाले. ड वर्गातून दादा पाटील फराटे हे भाजपकडून रिंगणात असून, ते दिवसभर मतदान केंद्रावर थांबून होते.
मतदार पाठीशी राहतील : अशोक पवार
जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नेहमीच शेतकरी हिताची भूमिका घेऊन शेतकरी कल्याणाच्या योजना राबविल्या आहेत. या नेत्यांमुळेच जिल्हा बॅंक प्रगतिपथावर आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पॅनेलच्या पाठीशी मतदार राहतील. आमदारकीच्या माध्यमातून मी कायम जनसामान्यांच्या संपर्कात आहे व परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्हा बॅंकेचे सर्व सुज्ञ मतदार हे जाणून आहेत. त्यामुळे मोठ्या विजयासाठी ते माझ्या पाठीशी राहतील, याबद्दल तीळमात्र शंका नाही, असे आमदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.
मी पाठिंबा देणार उमेदवार जिंकतो : पाचर्णे
जिल्हा बॅंक निवडणुकीत मी ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो किंवा पाठिंबा देतो, त्याचा विजय होतो, हे गेल्या सलग अनेक निवडणुकांत दिसून आले आहे. हा योगायोग समजा अथवा आमच्या मागील सामान्य मतदारांचा भक्कम पाठिंबा समजा. पण ही वस्तुस्थिती आहे. या निवडणुकीतही याच योगायोगाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येईल. ‘मी म्हणजेच सर्व आणि सर्व काही ते मलाच हवे’ या प्रवृत्तीला रोखण्यास मतदार उत्सुक असल्याने तेच या निवडणुकीत चमत्कार घडवतील, असे भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.
मतदानाचे माप माझ्याच पदरात टाकले आहे : गव्हाणे
भपकेबाज प्रचारापेक्षा मी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर व त्यांच्या मनाचा कानोसा घेण्यावर भर दिला. या निवडणुकीच्या निमित्ताने शिरूर तालुक्यात व विशेषतः जिल्हा बॅंकेच्या मतदारांत सन्नाटा जाणवला. ‘बोलेगा तो कान काटेगा’, अशी धास्ती बाळगलेल्या मतदारांनी सुप्त पसंतीचे माप माझ्याच पदरात टाकले आहे. त्यामुळे विजयाबाबत मला आत्मविश्वास आहे, असे जिल्हा बॅंक निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आबासाहेब गव्हाणे यांनी स्पष्ट केले.
अशोक पवारांचा एकतर्फी विजय होणार : पाचुंदकर
शिरूर व आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नसून पक्ष एकसंध आहे. नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चांगला समन्वय आहे. त्याचीच प्रचिती जिल्हा बॅंक निवडणुकीतील मतदानावरून व आमदार अशोक पवार यांच्या एकतर्फी विजयातून दिसून येईल. उद्याचा विजय चांगल्या मताधिक्क्याने होईल, असे शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.