Pune News, 08 Sep : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी देण्याच्या ठरावावरून कासारी (ता. शिरूर) येथे आज (ता. ७) चांगलाच वाद पेटला. ठरावाच्या बैठकीला जात असलेल्या हनुमान विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र रामचंद्र काकडे यांना अडवून शिवीगाळ व जबर मारहाण करण्यात आली.
‘आमच्या विरोधात ठराव दिला तर तुला जीवे मारू,’ अशी धमकीही देण्यात आल्याचे काकडे यांनी शिक्रापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सुरज संभाजी भुजबळ, आकाश दिलीप भुजबळ, कृष्णा मधुकर भुजबळ, विशाल प्रकाश भुजबळ, अमोल कैलास भुजबळ व संभाजी काळूराम भुजबळ या सहा जणांविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२६-३१ पार्श्वभूमीवर कासारी येथील हनुमान विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने मतदान प्रतिनिधी देण्याचा ठराव करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक काल (ता.०७) नियोजित होती. काकडे हे आपले सहकारी संचालक गुलाब बबनराव सातपुते, संदीप भगवान रासकर, सुखदेव ज्ञानोबा भुजबळ, बापू खंडू नरके व लिलावती महादू रासकर यांच्यासमवेत सकाळी साडेदहाच्या सुमारास सोसायटी कार्यालयाकडे जात होते.
त्यावेळी सुरज संभाजी भुजबळ, आकाश दिलीप भुजबळ, कृष्णा मधुकर भुजबळ, विशाल प्रकाश भुजबळ व अमोल कैलास भुजबळ हे कार्यालयाबाहेर उभे असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ‘तुम्ही सोसायटीत जायचे नाही. जिल्हा बँकेसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून जो ठराव द्यायचा आहे, तो आमच्या विचारांचा दिला जाणार आहे,’ असे संबंधितांनी काकडे यांना सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावर काकडे यांनी ‘हा निर्णय बैठकीत ठरवू,’ असे सांगितल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ करीत काकडे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
काकडे यांच्यासोबत असलेल्या इतर संचालकांनी मध्यस्थी करीत त्यांची सुटका करून त्यांना सोसायटी कार्यालयात नेले. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. संभाजी काळूराम भुजबळ यांच्यासह संबंधितांनी कार्यालयात येऊन पुन्हा काकडे यांना शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी ‘आमच्या विरोधात ठराव दिला तर तुला जीवे मारून टाकू,’ अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष अनिल नानाभाऊ नवले घटनास्थळी आले. त्यावेळी उपस्थित संचालकांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर काकडे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
जिल्हा बँकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मतदान प्रतिनिधीच्या ठरावावरून झालेल्या वादाला थेट मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे स्वरूप आल्याने या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीनुसार संबंधित सहाही जणांविरुद्ध जमाव जमवून मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.