shivajiroa adhalrao patil sarkarnama
पुणे

उद्धव ठाकरे झाले कठोर ; शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

भरत पचंगे

शिक्रापूर ( पुणे) : बंडखोरी करणाऱ्या आमदारांवर शिवसेनेने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या गटनेतेपदावरुन हटविण्यात आल्यानंतर आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Ahalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.(Shivajirao Ahalrao Patil latest news)

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत त्यांनी त्यावर गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं कॅप्शन लिहिलं होतं. यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकलेला नव्हता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात वेगळं वळण लागलं अनेक घडामोडी घडल्या. बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाई करण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Ahalrao Patil) यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना राष्ट्रवादीच्या जाचापासून वाचवा, त्यांना जगूद्या असे थेटपणे बोलणारे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सलग तीन टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव यांना पक्षातून काढले. याबाबत आढळराव यांची प्रतिक्रिया मिळाली नसली तरी त्यांच्या कार्यालयाकडून याबाबत दुजोरा देण्यात आला आहे.

सन २००४ मध्ये राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत आले होते. खेड लोकसभा मतदार संघातून ते खासदार झाले होते. नंतर शिरुर मतदारसंघातूनही आढळरावांनी पुणे जिल्ह्यातून खासदारकीची हॅट्रीक केली होती. दरम्यान राष्ट्रवादीने जंग-जंग पछाडूनही आढळरावांना हरविता आले नसताना सन २०१९ मध्ये विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत घेऊन आढळरावांचा पराभव केला.

उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादीची तक्रार

महाविकास आघाडी स्थापन झाली आणि आंबेगाव विधानसभा मतदार संघातील दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्रीपद दिल्याने आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने त्यांना व शिवसैनिकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार आढळरावांनी ठाकरेंकडे केली होती.

राष्ट्रवादीच्या जाचापासून वाचवा!

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून मेळावे घेवून शिवसैनिकांची व शिवसेनेच्या नेत्यांची बाजू जाणून घेण्यात आली. त्यात आढळराव यांनी पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना राष्ट्रवादीच्या जाचापासून वाचवा, त्यांना जगूद्या अशा स्वरुपाची वक्तव्ये केली होती. याच त्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनाभवनात बरीच उलट-सुलट चर्चा झाल्याचे बोलले जाते. काल (ता. २) रात्री उशिरा शिवाजीराव आढळराव यांच्या उपनेतेपदासह शिवसेना सदस्य म्हणून त्यांना काढून टाकल्याचे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून जाहीर करण्यात आले.

आढळरावांची दुपारी पत्रकार परिषद

आढळराव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही, मात्र त्यांच्या कार्यालयाकडून वरील कारवाई बाबत दुजोरा देण्यात आला व दुपारी एक वाजता लांडेवाडी (ता.आंबेगाव) किंवा पुण्यात पत्रकार परिषद घेवून आढळराव आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT