Pune News: गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावरून पुण्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतानाच आता आणखी एका मुद्द्यावरून महापालिका प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या काळात शहरात होणाऱ्या अनधिकृत जाहिरातबाजीला आळा घालावा, तसेच बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्जवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेने पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नाही, यावरून पुण्यात सध्या राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि गणेश मंडळांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. डीजेच्या समर्थनार्थ काही संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर विविध आंदोलने आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच युवा सेनेने आता गणेश उत्सवातील अनधिकृत जाहिरातबाजीचा मुद्दा पुढे आणला आहे.
युवा सेनेचे पुणे महानगर अध्यक्ष हेमंत बागुल यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना याबाबत पत्र दिले आहे. गणेशोत्सवात गणेश मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांवर नियमांचा बडगा उगारला जात असताना व्यावसायिक कंपन्यांच्या जाहिरातींकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल या पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी परवानगीविना किंवा नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर बॅनर, होर्डिंग्ज आणि जाहिराती लावल्या जात असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. कंपन्या सार्वजनिक जागांचा व्यावसायिक वापर करून मोठी उलाढाल करत असताना महापालिकेच्या नियमांचे आणि शुल्काचे पालन केले जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच; मात्र काही ठिकाणी हे फलक अपघाताचे कारण ठरू शकतात. त्यामुळे एखाद्या अनधिकृत जाहिरातीमुळे अपघात होऊन जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोणाची, असा थेट सवालही युवा सेनेने प्रशासनाला केला आहे.
केवळ बॅनर काढून उपयोग नाही; कंपन्यांवर कारवाईची मागणी
अनधिकृत जाहिराती आढळल्यानंतर केवळ बॅनर काढण्याची औपचारिक कारवाई न करता संबंधित जाहिरातदार आणि कंपन्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेचे नुकसान झाले असल्यास संबंधितांकडून संपूर्ण शुल्क आणि दंड वसूल करावा, अशीही भूमिका युवा सेनेने मांडली आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास अनधिकृत जाहिरातींची ठिकाणे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही युवा सेनेने दिला आहे. त्यामुळे डीजेच्या वादानंतर आता बॅनर-होर्डिंग्जच्या मुद्द्यावरून पुण्यात नवा राजकीय संघर्ष पेटणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.