Six highway police personnel and wardens face criminal charges after allegedly demanding ₹5 lakh from tourists by threatening to implicate them in a fake drug case. Sarkarnama
पुणे

Pune: पुण्यात वर्दीनेच आणली लाज! पर्यटकांना लुटण्यासाठी पोलिसांचीच फिल्डिंग; ग्रामीण दलातील 6 खंडणीखोर अटकेत

Pune Highway Police, Extortion Case, Lonavala Tourists: पुणे-लोणावळा मार्गावर पर्यटकांना खोट्या अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी देत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन पोलीस आणि तीन वॉर्डनविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

Sudesh Mitkar

Pune Highway Police Extortion Case: पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या म्हणजेच गांजा आढळण्याचा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे खंडणी मागणारे दुसरे-तिसरे कोणी नसून चक्क हायवे पोलीस आणि वार्डन आहेत. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात ३ पोलीस आणि ३ वार्डन अशा एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचे देखील सांगितलं जात आहे. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी यामध्ये ठोस भूमिका घेतल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

राज्य महामार्ग पुणे विभागाचे पोलीस शिपाई अमोल नन्नवरे, तुषार ढावरे, पोलीस नाईक अमोल वायकर यांच्यासह तीन वार्डन अशा सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महामार्गाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी या कारवाई बाबत माहिती दिला आहे. याप्रकरणी भूषित उमेश शर्मा (वय २८, रा. विमाननगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

नेमकं काय घडलं?

५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी तक्रारदार भूषित शर्मा हे त्यांचे मित्र मोहम्मद काशान आझमी (वय २८, रा. सिडको, संभाजीनगर), त्यांची पत्नी फायझा जमिल आणि मेहुणा सय्यद जुबेर अहमद यांच्यासह कारने लोणावळ्याकडे फिरायला जात होते. रात्री साडेआठच्या सुमारास कामशेतजवळील ताजे गाव येथे अंबर दिवा असलेल्या झायलो कारमधील पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या सहा जणांनी त्यांची गाडी तपासणीच्या नावाखाली अडवली.

'गांजा काढून द्या, नाहीतर...' पोलिसांची धमकी

गाडी अडवल्यानंतर "आम्ही महामार्ग वाहतूक पोलीस आहोत, तुमच्या मोटारीतील गांजा आणि ड्रग्ज काढून द्या, नाहीतर तपासणी करून कारवाई करावी लागेल," अशी धमकी या पोलिसांनी पर्यटकांना दिली. दरम्यान, तक्रारदाराचे मित्र मोहम्मद आझमी यांच्याकडे 'अंबर लीफ' या कंपनीचे सिगारेटचे पाकीट सापडले. या पाकिटाचा आधार घेत "पोलीस कारवाई नको असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील," अशी थेट मागणी केली.

एटीएम केंद्रावर नेले, अन्...

पैसे उकळण्यासाठी पोलिसांनी या पर्यटकांना तळेगाव येथील एटीएम केंद्रावर नेले. यावेळी फिर्यादीने वरिष्ठ पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांच्या सोबत असलेल्या एका मुलाने आपल्या स्मार्टवॉच वरून पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही बाब खंडणीखोर पोलिसांच्या निदर्शनास आली. आपला भांडाफोड होणार हे लक्षात येताच, आरोपी पोलिसांनी फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तिथेच सोडून स्वतःच्या गाडीतून पळ काढला.

सुरुवातीला हा प्रकार भामट्यांचा किंवा गुन्हेगारांचा असावा, असा संशय पर्यटकांना आला होता. परंतु, अधिक तपासात हे अपहरणकर्ते चक्क गणवेशातील अधिकृत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खाकी वर्दीचा धाक दाखवून पर्यटकांना लुटणाऱ्या या पोलिसांवर आता कडक कारवाईची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT