Devendra Fadnavis, Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha Election 2024: पुण्यात मोहोळांसाठी फडणवीसांची 'फिल्डिंग'; म्हणाले, 'काम करणाऱ्या मोदींसाठी...'

Sudesh Mitkar

Pune Lok Sabha Election 2024: पुणे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुण्यामध्ये दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील बाणेर येथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी ही निवडणूक पालिकेची नसून देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक असल्याचे सांगत विविध मुद्द्यांना हात घातला.

सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांची भाषणे ऐकतो तेव्हा ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे की, महापालिकेची हेच कळत नाही. पुढची पाच वर्षे जनसामान्यांच्या आशा आकांक्षा, सुरक्षा, विकास यांची विचार करण्याची ही निवडणूक आहे. एकीकडे विकासपुरूष नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या समवेत वेगवेगळे 18 पक्षांची महायुती आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबरोबर 24 पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. 24 नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडतील. 140 कोटी लोकांचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदी यांना विरोधी पर्याय उपलब्ध करू शकले नाहीत. सबका साथ सबका विकास मोदीजी करीत आहेत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते पुढे म्हणाले, विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे. मोदीजींनी काय जादू केली 25 कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर आले. 20 कोटी लोकांना घरे मिळाली. 50 कोटी लोकांना शौचालये, 60 कोटी लोकांना नळाद्वारे पाणी, 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्षे रेशन देणार, 55 कोटी लोकांना आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजना, 63 कोटी लोकांना मुद्रा कर्ज, त्यात 50 टक्क्यांहून जास्त मुली आणि महिला आहेत, 20 लाखापर्यंतचे लोन आता देणार, 80 लाख बचतगटांना निधी दिला, 10 कोटी लखपती दीदी होतील.

तसेच बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना आणली, आधुनिक प्रशिक्षण दिले, ज्येष्ठ नागरिकांना सर्व उपचार मोफत केले, वयोश्री योजना आणली, दिव्यांगासाठी कृत्रिम पाय आणि हाताच्या फॅक्टरी भारतात उघडल्या, मोदीजींनी पहिल्यांदा शहरांची काळजी केली, आधी शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा. मोदीजींनी घनकचरा व्यवस्थापन एसटीपीसाठी पुण्याला (Pune) निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी निधी दिला. पुण्यात मेट्रो (Pune Metro) धावतेय. त्याचे नेटवर्क तयार होतंय. प्रदूषण टाळलं जातंय, मेट्रोसह इलेक्टिक बस आल्या. सर्वाधिक इलक्ट्रिक बसेस पुण्यात आहेत. स्मार्ट सिटीचे व्हिजन आहे. मोदीजींच्या निधीतून कामे केली. प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे दिली. त्यामुळे सुनियोजित शहर तयार होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

पवार बरोबर आल्याने विकास आणखी गतीने होणार

2014 पासून बदललेले पुणे आपल्याला बघायला मिळाले. अजित पवार (Ajit Pawar) बरोबर आल्याने विकास आणखी गतीने होणार असून एअरपोर्ट, रिंगरोड यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. पुणे हे मॅन्युफॅकचरिंग आयटी हब आहे. देशातील सर्वोत्तम शहर बनण्याची ताकद पुण्यात आहे. आपण केवळ एक खासदार निवडून देत नाही, तर पुण्याकरता काम करणाऱ्या मोदींसाठी खासदार निवडून देत आहोत. त्यांच्या माध्यमातून काम करायचे आहे. बापट साहेबांनी चांगले कामं केले. त्यांचे काम पुढे न्यायचे आहे.

तसेच आपले पंतप्रधान जागतिक नेते झाले आहेत. एक मजबूत भारत मोदींमुळे झाला आहे. आधी देशात बॉम्बस्फोट व्हायचे आणि केवळ अमेरिकेत जावून त्याचे पुरावे द्यायचे. मात्र, मोदी पंतप्रधान झाल्यावर बॉम्बस्फोट होताच आपण सर्जिकल स्टाईक केला. जगातील पाचवी अर्थव्यवस्था आपला देश बनला. त्यातून संधी, रोजगार, गरीब कल्याण, मजबूत देश तयार होत आहे. लोकशाहीत मतदानाचा पवित्र अधिकार आहे. जो मतदान करतो त्याला नैतिक अधिकार आहे. मतदान ही देशसेवा आहे. तुमच्या मतदानातून कर्तबगार सरकार तयार होते. कमळाचे बटन दाबा, मुरलीधर मोहोळ यांना मत मिळेल. तुमचे आशीर्वाद मोदींना मिळतील मोदीजी मजबूत भारत बनवतील, असं आवाहन फडणवीसांनी यावेली मतदारांना केलं.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT