Pune Congress Sarkarnama
पुणे

Pune Loksabha : धंगेकर इच्छुक पुण्यात; जबाबदारी सातारची, विश्वजित कदम पुन्हा पुण्याची खिंड लढवणार ?

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी आता काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून प्रदेश काँग्रेसकडून महाराष्ट्रातील काही लोकसभा जागांसाठी समन्वयकाची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. पुण्यातील चार नेत्यांना महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. मात्र यात पुण्यामध्ये इच्छुक असलेल्या चारही उमेदवारांना इतर लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर 2014 ची निवडणूक पुण्यातून लढलेल्या आमदार विश्वजित कदम यांना पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस (Congress) हायकमांडकडून नुकतीच मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्या त्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून मोर्चेबांधणी करणार आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणता उमेदवार योग्य ठरेल याबाबतदेखील वरिष्ठांना सल्ला देण्याचा कामदेखील हे निरीक्षक करतील. त्यामुळे काँग्रेसकडून देण्यात आलेली ही जबाबदारी महत्त्वाची समजली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस हायकमांडकडून जाहीर करण्यात आलेल्या निरीक्षकांच्या यादीमध्ये आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय बालगुडे आणि माजी शहराध्यक्ष अभय छाजेड यांची नावे आहेत. आगामी लोकसभा (Loksabha) निवडणुकीसाठी काँग्रेसकडून हे चारही नेते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता या नेत्यांवर विविध मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांना सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, तर माजी आमदार मोहन जोशी यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे. संजय बालगुडे यांच्याकडे माढा, तर अभय छाजेड यांच्याकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल.

पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांना देण्यात आली आहे. विश्वजित कदम यांनी 2014 मध्ये पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना भाजप उमेदवार अनिल शिरोळे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी दिल्याने विश्वजित कदम पुन्हा एकदा पुण्यातून लोकसभा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे,

तर दुसरीकडे पुण्यातून इच्छुक असलेले आणि लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जाणारे रवींद्र धंगेकर यांच्याकडे सातारा लोकसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे धंगेकर यांना पुण्यापासून दूर ठेवण्यात येते का? असादेखील प्रश्न या नियुक्तीमुळे समोर आला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी अधिक रंजक बनणार आहेत.

अर्ज मागवले

कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबतचे पत्रक रविवारी काढले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण माहितीसह आपले अर्ज मंगळवारपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत सादर करावे लागणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकामध्ये नमूद केले आहे. अर्ज प्रक्रिया सुरू करून कॉंग्रेसने निवडणुकीसाठीची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

यांच्याकडे आहे जबाबदारी

1) विश्वजित कदम - पुणे

2) माजी आमदार मोहन जोशी - अहमदनगर

3) आमदार रवींद्र धंगेकर - सातारा

4) संजय बालगुडे - माढा

5) अभय छाजेड - हातकणंगले

(Edited By - Chaitanya Machale)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT