Pune News, 21 Apr : स्वारगेट पोलीस ठाण्यात ‘लव्ह जिहाद’चा गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांच्या घराला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावून महापालिका प्रशासनाने थेट ‘मानसिक छळ’ सुरू केल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक धीरज घाटे यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.
घाटे यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. “पीडित कुटुंबाला टार्गेट करून नोटीस पाठवली जाते, आजूबाजूच्या इतर कोणत्याही घराला अशी नोटीस नाही, फक्त या एका घरालाच अनधिकृत म्हणून निशाणा साधला जातोय. ही कारवाई राजकीय द्वेषातून की अन्य कुठल्या हेतूने केली गेली, याचा शोध घ्या! संबंधित दोन अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करा, नाहीतर सभागृह चालू देणार नाही,” असा इशारा देत घाटे यांनी सभेत तणावपूर्ण वातावरण निर्माण केले.
भवानी पेठेतील एका कथित लव्ह जिहाद प्रकरणी पीडित मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने मात्र पीडितेच्या वडिलांच्या घराला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली. ही नोटीस 16 एप्रिल रोजी ऑनलाइन तक्रारीच्या आधारे पाठवण्यात आली होती.
धीरज घाटे यांनी सभेत टीका करताना म्हटले, “ही नोटीस घटनेच्या 3 दिवस आधी पाठवली गेली. पीडित कुटुंबाला खच्चीकरण करण्यासाठी, मानसिक त्रास देण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे. ही बेकायदेशीर कारवाई का? यामागे कोणाचा हात आहे? तक्रारदाराचे नाव जाहीर करा!”
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी याला तीव्र विरोध दर्शवला. “पीडितेचे नाव सभागृहात घेणे कायद्याने गुन्हा आहे. घाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो,” असा इशारा देत शिंदे यांनी घाटे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. “ही नोटीस प्रकरणापूर्वीची आहे की नंतरची, याची प्रथम शहानिशा करा. उगाच राजकीय रंग देऊ नका,” असेही ते म्हणाले.
सभेत भाजप-काँग्रेस सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
नगर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, “ही नोटीस या प्रकरणाशी संबंधित आहे का, हे तपासावे लागेल. तक्रार ऑनलाइन आली होती.” अखेर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत मध्यस्थी केली.
“तक्रार आल्यानंतर 10 दिवसांनी ही नोटीस दिली आहे. पोलिसांत तक्रार दाखल होण्यापूर्वीचा हा विषय आहे. जर ही कारवाई राजकीय द्वेषातून किंवा चुकीच्या हेतूने केली असेल, तर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. दोन दिवसांत चौकशीचा निष्कर्ष काढला जाईल,” असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यानंतर सभागृहातील गोंधळ थांबला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.