Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. निविदा प्रक्रिया, विकासकामे, आर्थिक व्यवहार आणि उत्तमनगर उपबाजारातील गाळे व परवाने वाटपात अनियमितता झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पणन संचालकांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, चौकशी पूर्ण होईपर्यंत बाजार समितीच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याची मागणी माजी सभापती दिलीप काळभोर आणि संचालक प्रशांत काळभोर यांनी केली आहे.
काळभोर यांनी ३० सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात बाजार समितीच्या कारभारातील कथित अनियमिततांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निविदा प्रक्रिया आणि विकासकामांमध्ये नियमांचे पालन केले जात नसल्याचा, तसेच समितीच्या निधीतून धनादेशाद्वारे मोठ्या रकमा वितरित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यवहारांमुळे संस्थेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत, चौकशी निष्पक्ष होण्यासाठी आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या उत्तमनगर उपबाजारातील आठवडे परवाने आणि व्यापारी गाळ्यांच्या वाटपावरूनही काळभोर यांनी आक्षेप घेतला आहे. सभापती आणि काही संचालकांच्या जवळच्या व्यक्तींना नियमबाह्य पद्धतीने परवाने व गाळे दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गाळ्यांचे वाटप लिलाव प्रक्रियेद्वारे झाले नसल्याने समितीचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वाटप प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बाजार समितीच्या कारभारासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी पणन संचालकांनी यापूर्वीच समिती नियुक्त केल्याचा उल्लेख तक्रारदारांनी केला आहे. मात्र, चौकशी सुरू असतानाही कथित नियमबाह्य आर्थिक व्यवहार आणि विकासकामे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल येईपर्यंत महत्त्वाचे आर्थिक निर्णय आणि व्यवहारांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पणनमंत्र्यांनी चौकशीचे निर्देश दिल्याने आता पणन विभागाच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. मात्र, आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
दरम्यान, बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. बाजार समितीचा कारभार पारदर्शक पद्धतीने सुरू असून, संचालक मंडळ कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी झालेल्या चौकशींमध्येही आरोपांमध्ये तथ्य आढळले नसल्याचा दावा त्यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने निराधार आरोप केले जात असल्याचा पलटवारही जगताप यांनी केला आहे.
आरोपांची चौकशी करण्याचे आदेश आणि त्याचवेळी सभापतींकडून आरोपांचे खंडन, यामुळे बाजार समितीतील संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. आता पणन विभागाच्या चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि आर्थिक निर्बंधांच्या मागणीवर काय निर्णय घेतला जातो, याकडे बाजार समितीच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.