Pune Municipal Corporation building ahead of the mayor and deputy mayor election, as civic body prepares for its first special meeting after general elections. Sarkarnama
पुणे

PMC Mayor : पुण्यात भाजपकडे अफाट बहुमत पण तरीही महापौरपदाचा सस्पेन्स कायम; अर्ज दाखल करताच चित्र क्लिअर होण्याची शक्यता कमीच!

Pune Mayor Election : पुणे महापालिकेच्या महापौर निवडीसाठी 3 फेब्रुवारीला नामनिर्देशन तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष सभेत अधिकृत निवड होणार असून भाजपची सत्ता निश्चित मानली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो, Sudesh Mitkar

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित दिनांक 6 फेब्रुवारी ऐवजी ही निवडणूक आता सोमवार, दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या दिवशी पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली विशेष सभा होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे 28 ते 30 जानेवारी या कालावधीत राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम सुरुवातीला निश्चित झाला नव्हता. त्यानंतर अखेर विभागीय आयुक्त कार्यालयाने गुरुवारी महापालिकेला या विशेष सभेची नवीन तारीख कळविली आहे. महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे ही बैठक पार पडणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 च्या कलम 19 (1) नुसार, या सभेत महापौर आणि उपमहापौर पदांची निवडणूक पार पडणार आहे. तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका (महापौर पदाचे आरक्षण) नियम, 2006 नुसार, पुणे महापालिकेचे महापौर पद महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

3 फेब्रुवारीलाच महापौर निवड

महापौर आणि उपमहापौर पदांसाठी नामनिर्देशन मंगळवार, 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नगरसचिव कार्यालयात सादर करण्याची मुदत आहे. महापालिकेच्या अलीकडील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 119 नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित होणार आहे.

सद्यस्थितीत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला उमेदवारच महापौरपदावर निवडला जाणार आहे. पण यात 2 अर्ज दाखल करून भाजप सस्पेन्स वाढवणार? की विरोधी पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार उभे करून निवडणूक लढवली जाणार, की भाजप एकच उमेदवार देणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

महापौर पदाचे आरक्षण आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या शासकीय दुखवट्यामुळे महापौर निवडीला उशीर झाला आहे. यामुळे इतर समित्यांच्या सदस्यांच्या निवडीतही विलंब होऊ शकतो, ज्याचा परिणाम नवीन स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर होण्याच्या स्वरूपात होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन, महापौर निवडीच्या दिवशीच होणाऱ्या विशेष सभेत स्थायी समितीसाठी एकूण 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम 30 (1) नुसार, सहा विशेष समित्यांवर प्रत्येकी 13 सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. यामुळे सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीमध्ये दिलेल्या नावांवरून प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदाचे चित्र स्पष्ट होईल. याच विशेष सभेत महापालिकेच्या या सहा विशेष समित्यांच्या सदस्यांचीही निवड पार पडणार आहे.

मात्र, महिला व बाल कल्याण समितीवर 13 सदस्य असतील, त्यापैकी 75 टक्के सदस्य महिला असणे अनिवार्य आहे. त्यामुळे सभागृहातील नोंदणीकृत पक्ष आणि गटांच्या तुलनात्मक संख्याबळाचा विचार करून, सभागृहनेते व विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून समित्यांवरील सदस्यांचे नामनिर्देशन अंतिम करण्यात येईल, असे नगरसचिव विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT