Pune News, 24 Aug: राज्यात महायुतीची समन्वय समिती बैठकीच्या माध्यमातून मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच, पुणे महापालिकेत मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे.
भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून तक्रार केल्यानंतर, आता राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनिल टिंगरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. पुणे महापालिकेत मित्रपक्ष असणाऱ्या भाजपकडून राष्ट्रवादीवर अन्याय होत असून मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी टिंगरे यांनी केली आहे.
नेमका वाद काय?
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे या दोन नगरसेवकांचा विकासनिधी सत्ताधारी भाजपने थेट 'शून्य' केला. कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीबाबत बालवडकर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सुहास टिंगरे यांनी स्वाक्षरी केली होती. या स्थानिक राजकीय मतभेदांमधूनच वादाची ठिणगी पडली. त्यानंतर भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची तक्रार केली. आता या कारवाईला प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीने थेट मुख्यमंत्र्यांचा दरबार गाठला आहे. सुनिल टिंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
पत्रातील मुख्य मुद्दे
स्थानिक पातळीवरील वैयक्तिक किंवा राजकीय मतभेदांचा राग संपूर्ण पक्षाच्या नगरसेवकांवर आणि त्यांच्या प्रभागातील नागरिकांवर काढला जात आहे. दोन नगरसेवकांचा निधी शून्य केल्यानंतर इतर नगरसेवकांचा निधीही रोखण्याची चर्चा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.
आश्वासनांना हरताळ
महापालिका निवडणुकीनंतर विरोधी बाकांवर बसूनही राष्ट्रवादीने महायुतीचा धर्म पाळत महापौर-उपमहापौर निवडणुकीत सहकार्य केले. गणेश बिडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून निधी व विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्वाचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष अंदाजपत्रकात राष्ट्रवादीला डावलण्यात आले.
प्रभाग समित्यांमध्ये डावलले
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची रचना अशा प्रकारे करण्यात आली, ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू शकले नाही. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रवादीने शहराच्या विकासाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. अगदी नुकत्याच झालेल्या मुख्य सभेत विमाननगर येथील ‘भारत मंडपम’च्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने सकारात्मक पाठिंबा दिला होता, याची आठवण पत्रात करून देण्यात आली आहे. तर या अन्यायाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिले होते, परंतु स्थानिक पातळीवर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
टिंगरेंची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी?
"महायुतीचे प्रमुख नेते म्हणून आपण नेहमीच सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. एखाद्या व्यक्तीशी असलेल्या मतभेदांमुळे प्रभागातील नागरिकांची विकासकामे थांबू नयेत. आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालून स्थानिक पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना समान व न्याय्य निधी मिळवून द्यावा." अशी मागणी सुनिल टिंगरे यांनी केली आहे.
दरम्यान रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप शमला नसतानाच आता पुणे महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादीचा वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. गणेश बिडकर यांच्या तक्रारपत्रानंतर आता सुनील टिंगरेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यावर काय तोडगा काढतात, याकडे संपूर्ण पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.