Ajit Pawar, Sunil Tingare, Murlidhar Mohol, Ravindra Chavhan Sarkarnama
पुणे

PMC Election: भाजपकडूनच युतीधर्माचं पालन होत नसेल, तर आपणही...?'राष्ट्रवादीच्या बैठकीत वातावरण तापलं

NCP Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत भाजपकडून युतीधर्म पाळला जात नसल्याचा आरोप करत मैत्रीपूर्ण लढतीला विरोध झाला. स्वतंत्र ताकद दाखवण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

सरकारनामा ब्यूरो

BJP NCP alliance Pune News : भाजप आपल्याबरोबर युती करत नाही, दुसरीकडे आपलेच कार्यकर्ते आपल्याच विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची का, त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रस्ताव आला तर स्वीकारावा आणि आपण आपली ताकद दाखवावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी मांडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद असल्याने या दोन्ही शहरात राष्ट्रवादी काँग्रेस समवेत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. राष्ट्रवादीला बाजूला ठेवताना शिवसेनेला मात्र भाजपने जवळ केल्याची सल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. शुक्रवारी (ता. 19) मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, विकास पासलकर, सुरेश घुले, प्रदीप देशमुख, अक्रूर कुदळे आदी उपस्थित होते.

टिंगरे यांनी पक्षाचा शहरातील आढावा मांडला. प्रभाग, यापूर्वी निवडून आलेले नगरसेवक, पक्षाची ताकद असणारे प्रभाग, जास्त जागा जिंकण्यासाठी काय केले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा झाली. ताकदीच्या नावाखाली भाजप (BJP) राष्ट्रवादीला बाजूला करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘‘भाजपकडून युतीधर्माचे पालन केले जात नसेल, तर आपण आपली फरफट का करायची,’’ अशी भूमिका मांडण्यात आली. त्यावर, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा केली जाईल, असे तटकरे यांनी आश्वासन दिले.

पक्षाकडे 700 इच्छुकांचे अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) तब्बल 700 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. पक्षाकडून अद्याप मुलाखती सुरू करण्यात आलेल्या नाहीत. येत्या दोन दिवसांत प्रभागनिहाय मुलाखती घेतल्या जातील, असे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT