महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरु आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थी संतापले आहेत. २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहेत.
काल (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आता विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) हे मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती त्यांनी एक्सवर दिली आहे.
"पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार," असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही काल एमपीएससीच्या विद्यार्थी आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासनही दिले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती एक्सवर दिली होती. "आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्या आहेत. कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश राज्य सेवा पूर्व परीक्षेत झालेला नाही. या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केली आहे. गुरुवारी दुपारी एक बैठक घेऊन त्यात यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल, असे त्यांनी मला आश्वस्त केले आहे, असे फडणवीस यांनी एक्सवर म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.