Ravindra Dhangekar: पुण्यातील व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान पोलिसांनी म्हणणं न मांडल्यानं न्यायालयाने पोलिसांना एक दिवसाची मुदत देत पुढील सुनावणी बुधवारीपर्यंत पुढे ढकलली. मात्र, पोलिसांनी जाणीवपूर्वक कोर्टात म्हणणे मांडणे टाळले का? ही पोलिसांची रणनीती अथवा खेळी आहे का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
शनिवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि रविवारी सुट्टी असल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज निश्चित केली होती. परंतु, सुनावणी दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्याने आपले लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले नाही. विशेष म्हणजे, म्हणणे मांडता का आले नाही, याचे कोणतेही कारण किंवा लेखी पत्रही पोलिसांनी न्यायालयाला दिले नाही. या घडामोडींवर धंगेकर यांचे वकील अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील म्हणाले, आजच या अर्जावर सुनावणी ठरली होती. परंतू, पोलिसांनी जाणीवपूर्वक आज त्यांचे म्हणणे मांडलेले नाही. त्यांना काय कारणामुळे म्हणणे मांडता आले नाही, याचे साधे लेखी पत्रही त्यांनी कोर्टाला दिलेले नाही. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची संधी दिली असून परवा दिवशी यावर पूर्ण सुनावणी होईल"
खलील शेख आत्महत्या प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी धंगेकर दाम्पत्यासह एकूण १४ जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अटकेची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने धंगेकर पती-पत्नीने न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
आज पोलिसांनी म्हणणे मांडणे टाळल्यामुळे धंगेकरांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी २२ जुलैपर्यंत त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम राहणार आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे 'तपासासाठी वेळ काढू धोरण' की 'अटकेची पूर्वतयारी' अशा विविध अँगलने कायदेशीर व राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेल्या खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ आणि दोन सुसाईड नोट सोडल्या होत्या. यामध्ये त्यांनी अडीच कोटी रुपयांचे येणे बाकी असल्याचे नमूद करत रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह इतरांना जबाबदार धरले होते. उत्कर्ष असोसिएट्स या फर्ममधील भागीदारांनी पैसे न दिल्याने मानसिक तणावातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप शेख यांच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस अधिक तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.