Pune Mahapalika News : पुणे महापालिकेत संख्याबळ कमी असूनही काँग्रेसने स्थायी समितीमध्ये मोठी राजकीय खेळी खेळली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपला पहिल्याच बैठकीत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसने दिलेला महत्त्वाचा प्रस्ताव नाकारल्यास अध्यक्षपदावर निवड होताच श्रीनाथ भिमालेंवर सर्वसामान्य पुणेकर नाराज होण्याची शक्यता आहे.
सोमवारी (ता. 23 ) होणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे श्रीनाथ भिमाले यांची निवड ही फक्त औपचारिकता राहिली आहे. स्थायी समितीत भाजपचे 12, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या रुपाने काँग्रेसचा फक्त 1 सदस्य आहे. काँग्रेसच्या याच एका सदस्याने सादर केलेल्या प्रस्तावामुळे पहिलीच बैठक राजकीयदृष्ट्या तापदायक ठरण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने शहरातील 500 चौरस फुटांखालील घरांचा मिळकतकर पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर महापालिकेच्या उत्पन्नावर सुमारे 250 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. दुसरीकडे, प्रस्ताव नाकारला गेला तर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांवर भाजपने पाणी सोडल्याची टीका काँग्रेसकडून होईल आणि पुणेकरांमध्ये नाराजी पसरू शकते, असा काँग्रेसचा स्पष्ट डाव असल्याचे दिसतं आहे.
काही दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेली 5 टक्के मिळकतकर वाढ मुख्यसभेत फेटाळून भाजपने पुणेकरांना मोठा दिलासा दिल्याचे श्रेय घेतले होते. आता काँग्रेसच्या या नव्या ठरावामुळे सत्ताधाऱ्यांची आणखी एक राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हा ठराव देताना वाढती महागाई, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना मदत आणि मध्यमवर्गीय-गरीब कुटुंबांच्या लहान घरांना दिलासा देण्याची गरज अधोरेखित केली आहे.
ठरावात म्हटले आहे की, महापालिकेची हद्दवाढ झाल्याने भविष्यात महसूल वाढू शकतो. तसेच, कर न आकारलेल्या मिळकतींवर कर लावून उत्पन्न वाढवता येईल. सध्या शहरात सुमारे 11 लाख 30 हजार निवासी मिळकती असून त्यापैकी 4 लाख 30 हजार मिळकती 500 चौरस फुटांखालील आहेत. या मिळकतींचा कर माफ केल्यास वार्षिक 250 कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होईल, असा अंदाज आहे.
भाजपसमोर आता दोन पर्याय आहेत – एकतर काँग्रेसचा ठराव मंजूर करून मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करणे किंवा प्रस्ताव नाकारून पुणेकरांच्या नाराजीला सामोरे जाणे. ही राजकीय चाल काँग्रेसने किती यशस्वी ठरवली याचे उत्तर पहिल्या बैठकीतच मिळेल!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.