Pune News : गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीची भररस्त्यात धिंड काढणे, त्याला मारहाण करून उठाबशा काढायला लावणे आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांसह १२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'मानवाधिकार संरक्षण कायदा' कलम १६ अंतर्गत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतान रेहमान शेख या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला गर्दीच्या रस्त्यावरून फिरवले. या वेळी त्याला मारहाण करत अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला, तसेच सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावून नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेबाबत स्वप्नील जाधव आणि तानाजी करचे यांनी मानवाधिकार आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीसोबत सादर केलेली छायाचित्रे आणि इतर पुरावे पाहता, पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता आरोपीला स्वतःच शारीरिक व मानसिक शिक्षा दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या कृत्यामुळे संबंधित व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचेही आयोगाने नमूद केले.
मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विभुते, रविकांत नंदनवार, महेश नलावडे या उच्च अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख आणि सूरज अंबासे या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी केले असून नोटीस जारी केली आहे.
आयोगाच्या या कडक भूमिकेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, कायदा हातात घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करणे अपेक्षित असते. परंतु, अलिकडच्या काळात पुणे पोलिसांकडून सिंघमगिरी’ दाखवत आरोपींची जाहीर ‘ऑन द स्पॉट’ न्याय देण्याचा पायंडा पाडला जात असल्याची टीका होत होती. मानवाधिकार आयोगाच्या या कडक इशाऱ्यामुळे आता ‘शॉर्टकट’ न्याय पद्धती वापरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.