Pune Porsche Car Accident:
Pune Porsche Car Accident: Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : मोठी बातमी, अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले ; त्रिसदस्यीय समितीमार्फत होणार चौकशी !

Chaitanya Machale

Pune Accident Porsche : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून यामध्ये अजून काही जणांचा समावेश आहे का ? याचा तपास सुरु करण्यात आला आहे. यासाठी ससूनमधील रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी पुणे पोलिसांकडून केली जाणार आहे.

भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवित प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरूण-तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. पबमध्ये जाऊन या अल्पवयीन मुलाने दारू प्यायली होती. त्यानंतर गाडी चालविण्याची त्याची स्थिती नसतानाही त्याने भरधाव वेगाने गाडी चालवून हा अपघात केला.

यानंतर अवघ्या 15 तासात या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला होता. त्यामुळे पोलिसांसह न्याय व्यवस्थेवर जोरदार प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोपीला जामीन मिळाल्याने सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरू होऊन यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप केले जात होते. त्यातच या अल्पवयीन मुलाला व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे आरोप देखील केले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात सर्वसामान्यांमध्ये वाढत असलेला रोष आणि पोलिसांवर वाढता दबाव लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी यात लक्ष घालत कडक कारवाईच्या सूचना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर या तपासाला वेग आला असून दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. या मुलाला वाचविण्यासाठी गाडीचा ड्रायव्हर बदलण्यात आला. पुराव्यांमध्ये छेडछाड करण्यात आल्याचे समोर आले होते. सोमवारी या प्रकरणात या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. ससून रूग्णालयाचे डॉ.अजय तावरे, श्रीहरी हलनोर, यांनी हा अल्पवयीन मुलगा कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी हा उद्योग केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांसह अन्य एका आरोपीला अटक केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. त्यांनी कशा पद्धतीने मदत केली. याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने आता पावले उचलली आहेत. यासाठी तीन सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. जेजे रूग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ते आपला अहवाल शासनाला देणार आहे. याबरोबरच पोलिसांच्या गुन्हे शाखेने देखील यामध्ये आता अधिक लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. पोलीस ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत. ससूनमधील त्या दिवशीचे रेकॉर्ड पुणे पोलिसांकडून (Police) तपासायला सुरुवात झाली आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. त्या दिवशी काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT