Pune Wall Painting in Rain Sarkarnama
पुणे

Pune Wall Painting in Rain : पुण्यात पावसातच भिंतींवर रंगकाम! आधी झाडांना पाणी, आता ‘चुना’; महापालिकेच्या कारभारावर संताप

PMC faces criticism after wall painting continued during heavy rain in Bibwewadi : बिबवेवाडीतील आदिनाथ सोसायटीमागील भिंतींवर मुसळधार पावसात रंगकाम; सहाय्यक आयुक्तांनी परवानगी नसल्याचे सांगितले, तर माजी नगरसेवकांचा निधी असल्याचा दावा; शिवसेनेकडून चौकशी व आंदोलनाचा इशारा.

Sudesh Mitkar

Pune Civic News : आधी धो-धो पावसात झाडांना पाणी घालण्याचा ‘पराक्रम’... अन् आता चक्क मुसळधार पावसात भिंतींवर रंगकामाचा ‘भन्नाट’ प्रयोग! पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सध्या कारभाराचा चांगलाच ‘पंचनामा’ पाहायला मिळत आहे.

पुणेकरांच्या घामाच्या आणि कराच्या पैशांची ही उघड-उघड उधळपट्टी सुरू असल्याची टीका केली जात आहेत.

पुणे (Pune) महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 21 (मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क) येथील आदिनाथ सोसायटीच्या मागील भिंतींवर सध्या महापालिकेकडून रंगकाम सुरू आहे. विशेष म्हणजे बाहेर धो-धो पाऊस पडत असतानाही हे काम अत्यंत जोरात सुरू ठेवण्यात आले. भिंतीला लावला जाणारा चुना पावसाच्या पाण्यात धुवून रस्त्यावरून वाहून जात असल्याचे विदारक चित्र येथे पाहायला मिळाले.

काही दिवसांपूर्वीच याच भागात पावसात टँकरने झाडांना पाणी देण्याचा ‘जावईशोध’ अधिकाऱ्यांनी लावला होता. तो प्रकार ताजा असतानाच आता पावसात रंगकाम करून महापालिकेला (Municipal) ‘चुना’ लावण्याची नवी किमया अधिकारी आणि नगरसेवकांच्या युतीने करून दाखवली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या या कारभाराबाबत प्रशासनाला काहीही थांगपत्ता नसल्याचे समोर आले आहे.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त शीतल वडके यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, "प्रभाग क्रमांक 21 मध्ये भिंत रंगवण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही आणि निधीही दिलेला नाही. तरीही हे काम नक्की कोणातर्फे सुरू आहे, याची माहिती घेतली जाईल."

तर दुसरीकडे, भाजप नगरसेविका मनिषा चोरबेले यांचे पती व माजी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी यावर अजब स्पष्टीकरण दिले आहे. "प्रभाग स्तरीय निधीतून भिंतीच्या सुशोभिकरणासाठी 2 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे खराब झालेली भिंत रंगवण्याचे काम सुरू केले होते, पण दुर्दैवाने त्याच वेळी पाऊस आला," असा दावा त्यांनी केला.

सार्वजनिक पैशांवर दरोडा

या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. "पावसात रंगकाम उडून गेल्यानंतर पुन्हा नव्याने निविदा काढून सार्वजनिक पैशांवर दरोडा टाकण्याचा हा डाव आहे का?" असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

अधिकारी, अभियंते अन् ठेकेदाराची चौकशी करा

भानगिरे पुढे म्हणाले, "सार्वजनिक पैशांची ही उधळपट्टी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. हे काम तातडीने थांबवून संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदाराची तात्काळ चौकशी करा. जर या भ्रष्ट कारभारावर चाप लावला नाही, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला प्रतीकात्मक काळा रंग फासून महापालिकेचा निषेध करू," असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT