Pune News : शिक्षणाचे माहेरघर' आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराची प्रतिमा गेल्या काही वर्षांत लागोपाठ झालेल्या परीक्षा घोटाळ्यांमुळे मोठी मलीन झाली आहे. आरोग्य भरती, म्हाडा भरती, टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) आणि आता थेट देशातील सर्वात मोठ्या 'नीट परीक्षा पेपरफुटीच्या केंद्रस्थानी पुण्याचे नाव आल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रत्येक मोठ्या घोटाळ्याची पाळेमुळे पुण्यातच का सापडतात? प्रश्न सर्वांनाच पडू लागले आहेत. त्या बाबतच्या पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर ..
देशभर गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित क्षेत्रातील व्यक्तींचा थेट सहभाग समोर आला आहे. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मॉडर्न महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र प्राध्यापक मनीषा मांढरे यांच्यासह मनीषा वाघमारे या ब्युटी पार्लरचालक महिला एजंटला अटक करण्यात आली आहे. या तिघांनी थेट राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या तज्ज्ञ मंडळातील व्यक्तींशी संगनमत करून प्रश्नपत्रिका मिळवल्या आणि त्या विद्यार्थी, पालक व क्लासचालकांना विकून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
लातूर येथील 'रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस' चा मुख्य संचालक प्रा. शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला सीबीआयने पुण्यातूनच बेड्या ठोकल्या आहेत. मोटेगावकर याने पुणे, लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि नाशिक यांसह राज्यातील ८ ते ९ शहरांमधील आपल्या शाखांमधील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत 'नीट २०२६' चा पेपर सर्क्युलेट केल्याचा सीबीआयला दाट संशय आहे. यावरून स्पष्ट होते की, परीक्षांचे मोठे नेटवर्क हाताळणारे मुख्य सूत्रधार पुण्यातच आश्रय घेतात किंवा येथूनच आपल्या हालचाली नियंत्रित करतात. कारण पुणे हे शैक्षणिक आणि कोचिंग क्लासेसचे मोठे केंद्र असल्याने येथे नेटवर्क तयार करणे सोपे जाते.
कारण पुण्याशी धागेदोरे जोडल्या गेलेल्या महाघोटाळ्यांची मालिका खूप मोठी आहे.
आरोग्य विभाग भरती (२०२१): राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संयुक्त संचालक महेश बोटले यांच्यासह अनेक मध्यस्थांना पुण्यातून अटक झाली होती.
म्हाडा भरती घोटाळा: परीक्षा घेणाऱ्या जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितेश देशमुख आणि त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश पुण्यातच झाला.
टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घोटाळा: शिक्षण विभागाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह अनेक एजंटना अटक करून त्यांच्याकडून कोट्यवधींची रोख रक्कम आणि मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
प्रत्येक घोटाळ्यात पुण्यातील व्यक्ती मुख्य भूमिकेत असल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून 'पुणे महाघोटाळ्यांचे केंद्र का?' असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्व प्रकरणांत सरकारी यंत्रणांतील अधिकारी, खासगी परीक्षा कंपन्या, शिकवणी वर्ग चालक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती आणि मध्यस्थ यांचे संगनमत दिसते. पेपरफुटीसाठी आंतरिक संपर्क, पैशाची देवाणघेवाण आणि विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्याचे जाळे हे सामान्य मुद्दे आहेत. पुणे हे या सर्व घटकांचे केंद्रबिंदू ठरते. तपासातून हे नेटवर्क आणखी विस्तारलेले असल्याचे समोर आले आहे.
जेव्हा एखादा घोटाळा बाहेर येतो, तेव्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्याच्या मोठ्या घोषणा केल्या जातात, समित्या नेमल्या जातात आणि काही अटकसत्रेही होतात. मात्र, काही महिन्यांतच तपास थंडावतो आणि जुन्या फायली धूळ खात पडतात. याच ढिसाळपणामुळे गुन्हेगारांना भीती उरलेली नाही. हे रॅकेट प्रशासकीय यंत्रणेसह राजकीय नेत्यांनाही 'मॅनेज' करत असल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. त्यामुळे केवळ वरवरची चौकशी नको, तर फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून दोषींना जलद आणि कडक शिक्षा झाली पाहिजे, तरच या महाघोटाळ्यांच्या केंद्राला आळा बसेल, अशी आर्त मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.