पैशांची गरज निर्माण झाली की माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. मोठ्या भावाकडून पैसे मिळवण्यासाठी एका 19 वर्षीय तरुणाने चक्क स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. कुटुंबीयांना अपहरण झाल्याचा विश्वास बसावा यासाठी त्याने रडतानाचा व्हिडिओही पाठवला. मात्र, पुणे पोलिसांच्या तपासामुळे त्याचा हा बनाव काही तासांतच उघडकीस आला.
ओम प्रकाश गौरीशंकर (वय 19) असे या तरुणाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बेबेरू तालुक्यातील जालालपूर गावचा रहिवासी आहे. कामानिमित्त तो पुण्यात आला होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्याला पैशांची गरज भासत होती. घरातून वारंवार पैसे मागूनही खर्च भागत नसल्याने त्याने मोठ्या भावाकडून पैसे उकळण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली.
गौरीशंकरने उत्तर प्रदेशातील आपल्या कुटुंबीयांना आपण "किडनॅप" झाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांना विश्वास वाटावा म्हणून त्याने ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ पाठवला. तसेच आपली सुखरूप सुटका हवी असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणीही केली.
मुलाचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घाबरले. त्यांनी शाहजहांपुर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून संबंधित तरुणाचे पुण्यात अपहरण झाल्याची माहिती दिली. अपहरणकर्त्यांनी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे समजताच पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
17 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी तरुणाचा शोध घेतला. उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यातून गौरीशंकर खडकी परिसरात असल्याचे समोर आले.
त्यानंतर बंडगार्डन पोलिसांसह रात्री गस्तीवर असलेले अधिकारी आणि मार्शल यांनी खडकीतील क्राउन प्लाझा लॉजिंग येथे धाव घेतली. पोलिस तेथे पोहोचले असता कोणतेही अपहरणकर्ते आढळले नाहीत. उलट, ज्या व्यक्तीचे अपहरण झाल्याचे सांगितले जात होते, तोच गौरीशंकर तेथे आढळून आला.
चौकशीत त्याने आपणच भावाला अपहरण झाल्याचे व्हिडिओ पाठवल्याची कबुली दिली. त्यानंतर स्वतःच्या अपहरणाचा संपूर्ण बनाव रचून 5 लाख रुपये मागितल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे पुणे पोलिसांसह कुटुंबीयांनाही धक्का बसला असून, पैशांसाठी रचलेला हा अजब कट आता चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.