Pune Students Protest Against Teacher Transfer Sarkarnama
पुणे

Teacher Transfer : 'आमचे गुरुजी आम्हाला हवेच!'; बदलीच्या निर्णयाविरोधात चिमुरड्यांनी पुकारलं पुण्यात आंदोलन

Children Protest for Teacher Pune School : पुण्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या गुरुजींच्या बदलीविरोधात आंदोलन पुकारले असून निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : "शिक्षक नकोत" किंवा "शिक्षकांची बदली करा" अशा मागण्यांसाठी ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं चित्र आपण अनेकदा पाहतो. मात्र, पुण्यामध्ये आज याच्या अगदी उलट आणि अत्यंत हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळालं. "आमचे गुरुजी खूप चांगलं शिकवतात, त्यांची बदली रद्द करा," अशी आर्त साद घालत खडकवासला जवळील गोऱ्हे बुद्रुक शाळेतील ५० ते ६० विद्यार्थ्यांनी थेट पुणे जिल्हा परिषद गाठली आणि इमारतीच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केलं.

नेमकं प्रकरण काय?

गोऱ्हे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील लोकप्रिय शिक्षक रजनीकांत मेंढे यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. हा निर्णय समजताच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले. या शिक्षकाने केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर जीवनाचं अवांतर शिक्षणही विद्यार्थ्यांना दिलं आहे. मेंढे गुरुजींच्या प्रयत्नांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या लक्षणीय वाढली असून, जे मुलं पूर्वी शाळेत येण्यास टाळाटाळ करायचे, ते आता आनंदाने शाळेत येऊ लागले आहेत.

चिमुरड्यांचा 'जिल्हा परिषदेत' ठिय्या

आज सकाळच्या सुमारास शाळेतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी धाव घेतली. आपल्या आवडत्या शिक्षकाला वाचवण्यासाठी या चिमुरड्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या इमारतीतच बसून ठिय्या मांडला. "आम्हाला मेंढे गुरुजीच हवेत," अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मेंढे गुरुजींनी शाळेचा कायापालट केला आहे. "अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकाची बदली होणं हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचं ठरेल. जो शिक्षक शाळेची प्रगती करतोय, त्यांना तिथेच राहू द्यावे," अशी मागणी पालकांनी केली आहे.

प्रेमापोटी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे रस्त्यावर उतरण्याची ही पुण्यातील दुर्मिळ घटना असून, आता जिल्हा परिषद प्रशासन यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT