MLC Election News : राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागासाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यानंतर आता सर्वांचे लक्ष 27 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. अशात साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुणे शिक्षक मतदारसंघात धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली आहे. अंदाजानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डाव यशस्वी होणार असल्याचे चित्र आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला होता. या ठिकाणी शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप विजयी होऊ शकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सुरुवातीपासून चुरस दिसत होती. महायुतीमध्ये या मतदारसंघाची मागणी भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली होती. मात्र, या मतदारसंघावरून भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच दिसत होती. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी याठिकाणी तयारी केली असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ भाजप सोडेल असे वाटत होते. मात्र, भाजपने सेनेला हा मतदारसंघ सोडला नाही. भाजपने याठिकाणी कौस्तुभ गावडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. यानंतर चिवटे यांना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन रिंगणात उतरवले.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर निवडणूक लढवली. तर माजी आमदार दत्तात्रय सावंत हेही शिक्षक संघटनांच्या पाठिंब्यावर मैदानात उतरले होते. याशिवाय शिवसेनेकडून तिकीट मागितलेल्या मंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनी ऐनवेळी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला.
दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या मंगेश चिवटे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. यानंतर शिवसेना भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता होती. पण सेनेने धक्कादायकरित्या सचिन सानप यांना पाठिंबा दिला. त्यानंतर या ठिकाणी शिवसेनेची सर्व यंत्रणा सचिन सानप यांच्या प्रचारामध्ये उतरली होती. मंत्री उदय सामंत ठाण मांडून बसले होते.
दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांनी भाजप उमेदवाराच्या विजयासाठी खिंड लढवली. मात्र, याठिकाणी साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पुणे शिक्षक मतदारसंघात धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप विजयी होऊ शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.