Pune Teacher Constituency News : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीचा रणसंग्राम तापण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीमधील अंतर्गत तणाव आणि नाराजी उघड झाली.
भाजपने आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल केले खरे, मात्र या सोहळ्यातून महायुतीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी पूर्णपणे गायब राहिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भाजपतर्फे पदवीधरमधून डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, महायुतीचे मुख्य घटक असलेले शिवसेना किंवा राष्ट्रवादीचा एकही प्रमुख नेता अथवा पदाधिकारी या संपूर्ण सोहळ्यात फिरकलासुद्धा नाही. अर्ज भरण्याच्या ऐन मोक्याच्या क्षणी मित्रपक्षांनी मारलेली ही दांडी महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि अस्वस्थता चव्हाट्यावर आणण्यास पुरेशी ठरली आहे.
या निवडणुकीत आणखी एक मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे, तो म्हणजे उमेदवारीचा केंद्रबिंदु पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांचे गणित 'कोल्हापूर'भोवतीच फिरताना दिसत आहे. काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपने दिलेले डॉ. स्मिता जाधव व कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार मूळचे कोल्हापूरचेच आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील इतर चार महत्त्वाच्या जिल्ह्यांना डावलून उमेदवारी फक्त एकाच जिल्ह्याला का? असा उद्विग्न सवाल आता उर्वरित जिल्ह्यांतील स्थानिक कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. प्रादेशिक असंतुलनाचा हाच फटका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बसणार की काय, अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक प्रशासनाच्या शिस्त आणि नियमांचा पुरता फज्जा उडाला. निवडणूक कार्यालयाच्या परिसरात सभा, बैठका आणि घोषणाबाजीवर प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र, उमेदवारांच्या समर्थकांनी विभागीय आयुक्तालयाच्या परिसरात नियमांना केराची टोपली दाखवत तुफान घोषणाबाजी केली.
सोशल मीडियावर रील आणि व्हिडिओ बाईट्स तयार करण्यासाठी चढाओढ सुरू झाल्याने दुपारी एकच्या सुमारास विधान भवन मुख्य इमारतीजवळ प्रचंड गोंधळ उडाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच प्रशासनाला तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवावा लागला.
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज मंगळवारी शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत पदवीधरमधून २१ तर शिक्षक मतदारसंघातून २७ जणांचे अर्ज दाखल झाले असून, एकूण संख्या अनुक्रमे २९ आणि ३१ वर पोहोचली आहे. एकीकडे महाविकास आघाडीने पदवीधरसाठी अद्याप अधिकृत पत्ता खोललेला नसताना, दुसरीकडे भाजपच्या मित्रपक्षांमधील नाराजी आणि इतर जिल्ह्यांतील असंतोषामुळे ही निवडणूक महायुतीसाठी सोपी राहिलेली नाही, हेच स्पष्ट होत आहे.
भाजपने दोन्ही जागांसाठी उमेदवार जाहीर करून निवडणुकीचा नारळ फोडला असला, तरी मित्रपक्षांच्या नेत्यांची अनुपस्थिती आणि कोल्हापूरच्या उमेदवारीवरून इतर जिल्ह्यांत निर्माण होणारी नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शक्तिप्रदर्शनापेक्षा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मैदानात महायुती किती एकसंध दिसते, यावरच भाजपच्या दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.