Pune Traffic | Hinjewadi IT Employees Protest AI Photo
पुणे

Pune Traffic : चाकणनंतर आता हिंजवडीत होणार सरकारची कोंडी; 'आयटीयन्स'चा एल्गार; ट्रॅफिकविरोधात आंदोलनाची हाक

Hinjewadi IT Employees Protest : हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज हजारो कर्मचारी या परिसरात ये-जा करतात. मात्र, कामाच्या वेळेत होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरे आणि खराब रस्ते यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ प्रवासातच जातो.

Jagdish Patil

Pune News, 28 Aug : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास रस्त्यावर ताटकळत राहावे लागत आहे. सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाल्यानंतर आणि संध्याकाळी कामावरून घरी परतताना वाहतूक कोंडीत अडकणे ही पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे.

या वाहतूक कोंडीचा आणि ढासळलेल्या पायाभूत सुविधांचा फटका थेट पुण्याच्या आयटी क्षेत्रालाही बसत आहे. काही दिवसांपूर्वी चाकणमधील उद्योजकांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांना कंटाळून स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमध्ये बैठक घेत विविध उपाययोजनांची घोषणा केली.

रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले. कंत्राटदारांना कामाच्या दर्जाबाबत इशाराही देण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही चाकणचा दौरा करावा लागला. मात्र, चाकणनंतर आता हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याची ‘आयटी हब’ म्हणून देश-विदेशात ओळख निर्माण करणाऱ्या हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते, पाण्याची समस्या आणि सुरक्षेच्या प्रश्नांविरोधात आयटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक ६ सप्टेंबरला मूक मोर्चा काढणार आहेत.

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील आयटी कर्मचारी तसेच स्थानिक रहिवाशांनी मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना पत्र दिले आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा मोर्चा होणार आहे. इन्फोसिस सर्कलपासून सुरू होणारा हा मोर्चा डसॉल्ट सिस्टीम्स आणि शिवाजी महाराज चौकातून पुन्हा इन्फोसिस सर्कलपर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व तब्बल ५०० महिला आयटी कर्मचारी करणार आहेत. आयटी कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे.

रोजच्या ट्रॅफिकचा संताप आता रस्त्यावर

हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज हजारो कर्मचारी या परिसरात ये-जा करतात. मात्र, कामाच्या वेळेत होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, अपुरे आणि खराब रस्ते यामुळे कर्मचाऱ्यांचा मोठा वेळ प्रवासातच जातो. काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी लागणारा अवाजवी वेळ, वाहतुकीचा ताण आणि त्यातून निर्माण होणारे प्रदूषण यामुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

‘आयटी हब’ म्हणून जगाच्या नकाशावर पुण्याची ओळख निर्माण झाली; पण याच आयटी हबकडे जाणारे रस्ते मात्र वाहतूक कोंडीने ठप्प होत आहेत, अशी भावना आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडीसोबतच पिण्याच्या पाण्याची टंचाई, रस्त्यांची दुरवस्था आणि सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे केवळ ट्रॅफिकची समस्या नसून परिसरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न घेऊन नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधणार आहेत.

६ सप्टेंबरच्या मूक मोर्चादरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना नागरिकांकडून मागणीपत्र सादर करण्यात येणार आहे. आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीने होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, तसेच पोलिसांनी घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन केले जाईल, अशी हमीही आयोजकांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंचा आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणि परिसराची दुरवस्था झाल्याची टीका त्यांनी केली. रस्त्यांची बिकट अवस्था, दररोजची प्रचंड वाहतूक कोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT