Pune University professor recruitment faces technical issues, putting 6000 candidates at risk. ATR form errors may impact careers. 
पुणे

FDA Action : तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृहाचा अन्न परवाना रद्द

Pune University Mess Closed : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाची दखल घेत आयुक्त मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने कारवायांचा प्रचंड धडाका लावला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 18 Jun : अन्न आणि औषध प्रशासनाचे धडक कारवाईचे सत्र राज्यात वेगाने सुरू असून, पुण्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

या धडक आदेशानंतर विद्यापीठातील 'मेस तात्काळ बंद करण्यात आली असून, कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. या भोजनगृहाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १६ जून रोजी तपासणी केली.

संबंधित भोजनगृहाबाबत समाजमाध्यमांवरून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान या मध्यवर्ती भोजनगृहात पाण्याच्या गुणवत्तेच्या नोंदी न ठेवणे, अन्न शिजवताना व साठवताना कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, तापमानाचे नियंत्रण न राखणे आणि संपूर्ण परिसरात कमालीची अस्वच्छता असणे अशा अन्न सुरक्षेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाची दखल घेत आयुक्त मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने कारवायांचा प्रचंड धडाका लावला आहे. दोनच दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकावरील एका कॅन्टीनमध्ये उघड्यावरील अन्नपदार्थ आणि तुटलेल्या, काळवंडलेल्या फरश्या अशा अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमुळे ते केंद्र थेट सील करण्याचे आदेश देण्यात आले होते.

एवढेच नव्हे तर, गेल्या काही दिवसांत पुणे विभागात राबवलेल्या विशेष मोहिमेत पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि बोपगाव येथील आंबा प्रक्रिया केंद्रांवर छापे टाकून तब्बल ५,७०० किलो सडलेले आंबे नष्ट करण्यात आले असून, भेसळयुक्त आंबा पल्प व आमरसाचा मोठा साठा जप्त करत तिथला परवाना निलंबित केला आहे.

याशिवाय शिरूरमधील पाबळ भागात राहत्या घरातून चालणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीवर छापा टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर वडगाव शेरी, चिंचवड आणि खराडी भागातील डेअरींवर छापे टाकून लाखो रुपयांचे भेसळयुक्त पनीर, अ‍ॅनालॉग चीज आणि गायीचे तूप जप्त करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित सुपारीच्या वाहतुकीवर आणि विक्रीवरही मोठी धडक कारवाई सुरू आहे. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या मोठ्या कारवायामांमुळे नियमबाह्य काम करणाऱ्या कंत्राटदारांचे आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, पुणे विद्यापीठातील या ताज्या कारवाईची सध्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT