Pune youth protest  Sarkarnama
पुणे

Pune youth protest : जमिनीच्या नोंद प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी तरुणाचं 'शोले स्टाईल' आंदोलन; अथक प्रयत्नांनंतर खाली उतरला !

Pune youth protest : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या संचेती रुग्णालयासमोरील उड्डाणपुलावरती तरुणाचं आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

Pune youth protest : तहसिलादारांकडे असलेले जमिनीच्या नोंदणीचे काम मार्गी लागत नाही म्हणून जुन्नर तालुक्यातील एका तरूणाने पुण्यातील शिवाजीनगर भागातील पुलावर चढून मंगळवारी (ता.3०) शोले स्टाईल आंदोलन केले. सुमारे चार तास हा तरूण पुलावर चढून बसला होता. पोलीस व प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानंतर तो खाली येण्यास तयार झाला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्यास सुमारास त्याला पुलावरून सुखरूप खाली उतरविण्यात आले.

पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या संचेती रुग्णालयाच्या समोरील पुलावर महेंद्र डावखर हा तरूण दुपारी तीनच्या सुमारास चढून बसला.जुन्नर तालुक्यातील सुलतानपूर येथील कुटुंबातील एकत्रित जमिनीच्या नोंदीच्या विषयात तहसिलदारांकडून न्याय मिळत नाही, असा डावखर याचा मुख्य आरोप होता.आपल्या मागणीसाठी डावखर याच्या वडिलांनी आज जुन्नर तहसिल कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. तर स्वत: महेंद्र डावखर याने पुण्यात येत पुलावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

तहसिलदारांकडे असलेले काम मार्गी लागत नसेल तर मी उडी मारून आत्महत्या करणार अशी धमकी महेंद्र देत होता. ही बातमी समजताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

जुन्नरच्या तहसीलदारांवर कारवाई करा,अशी मागणी करीत हा तरूण पुलावरून जोरजोरात घोषणाबाजी करीत होता.जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. मी पुलावरुन उडी मारणार, असा पवित्रा संबंधित या तरूणाने घेतला.सिग्नलवर असलेल्या बाईकस्वरांनी गाड्या बाजूला घेऊन संबंधित प्रकार काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेकडो गाड्या एकाच जागेवर थांबल्या. परिणामी मोठी वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, संबंधित तरूणाच्या जमिनीच्या नोंदणी प्रकरणात नियमानुसार योग्य कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, घेतलेला निर्णय डावखर यांना मान्य नव्हता. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे स्वातंत्र्य डावखर यांना आहे. आजच्या प्रकरणात महेंद्र डावखर यांच्या वडिलांनीदेखील जुन्नर तहसिल कार्यालयसमोर आंदोलन केले. परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर सायंकाळी त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जुन्नरचे तहसिलदार रवींद्र सबनीस यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

SCROLL FOR NEXT