उरुळी कांचन (पुणे) : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व हवेली तालुक्याच्या चार गटांपैकी तीन गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असली, तरी अनेक अनुभवी आणि सक्रिय पुरुष इच्छुकांची राजकीय गणितं कोलमडली आहे. नाराजीचा सूर उमटत आहे.
या भागातील उरुळी कांचन - सोरतापवाडी, थेऊर - आव्हाळवाडी, लोणी काळभोर - कदमवाकवस्ती आणि कोरेगावमूळ – केसनंद हे चार जिल्हा परिषद गट आहेत. यापैकी उरुळी कांचन - सोरतापवाडी गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित करण्यात आला आहे. उर्वरित तीन गट महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यात नागरी मागास प्रवर्ग महिला, अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे.
आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच पुणे जिल्ह्यातील काही संभाव्य उमेदवारांनी मैदानात जोरदार तयारी सुरू केली होती. अनेकांनी सोशल मीडियावर 'भावी जिल्हा परिषद सदस्य' म्हणून पोस्ट व्हायरल केल्या होत्या. मात्र आरक्षणानंतर हे चित्र पूर्णपणे बदलले असून, इच्छुक पुरुषांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता पुढील पाच वर्षांची वाट पाहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
आरक्षणानंतर संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. उरुळी कांचन -सोरतापवाडी गट अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्याने माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. जीवन शिंदे या नावांची जोरदार चर्चा आहे. इतर गटांमध्ये महिला उमेदवारांसाठी संधी खुली झाली आहे. वाडेबोह्वाई येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे, केसनंदच्या माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा हरगुडे, अष्टापूरच्या माजी सरपंच कविता जगताप, तसेच कोरेगावमूळ येथील समाजसेविका संगीता शितोळे ही नावे आघाडीवर आहेत.
उरुळी कांचन : सोरतापवाडी अनुसूचित जाती
थेऊर : आव्हाळवाडी नागरी मागास प्रवर्ग महिला
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती अनुसूचित जाती महिला
कोरेगावमूळ : केसनंद सर्वसाधारण महिला
आरक्षणामुळे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्या, तरी काही गटांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. काही गटात एकाच पक्षातील अनेक महिला इच्छुक असल्याने आतील स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणे नव्याने जुळवण्याचे आव्हान आता सर्वच पक्षांपुढे आहे. आगामी काही दिवसांत इच्छुकांची अधिकृत नावे जाहीर होण्यास सुरुवात होणार असून, निवडणुकीच्या दृष्टीने येत्या काळात पूर्व हवेलीतील वातावरण चांगलेच तापणार, हे निश्चित!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.