Preparations underway at Pune Zilla Parishad building as renovated chambers await newly elected office bearers amid vehicle and housing constraints. Sarkarnama
पुणे

Pune ZP News : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अन् पदाधिकाऱ्यांना हक्काचं घर नाहीच! भाडे देऊन करावी लागणार निवासाची व्यवस्था, गाडीही जुनीच

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांसाठी दालनांचे सुशोभीकरण पूर्ण झाले असले तरी वाहन आणि निवासाची नवी सुविधा नाही. जुनी वाहने आणि भाड्याच्या घरावरच समाधान मानावे लागणार.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने कार्यालयीन दालनांच्या सुधारणा व सुशोभीकरणाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. तरीही वाहन व्यवस्था आणि निवासाची सोय याबाबत मात्र जुन्याच सुविधांवरच समाधान मानावे लागणार असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व पुणे जिल्ह्यात पाहायला मिळालं. त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादीचाच (NCP) असणार आहे. एकीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि इतर समित्यांच्या माळा कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र प्रशासन वेगळ्याच कामाला लागले आहे.

जुन्याच गाड्या

21 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर संस्थेत प्रशासक राजवट लागू झाली होती. त्यावेळी पदाधिकाऱ्यांकडे असलेली सर्व शासकीय वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांत ही वाहने विविध अधिकाऱ्यांच्या वापरात राहिली आहेत. विशेषतः अध्यक्षांसाठी वापरात असलेली इनोव्हा गाडी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. या कालावधीत पदाधिकाऱ्यांसाठी कोणतीही नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना जुनीच वाहने वापरावी लागणार आहेत.

भाड्याची घरं

दरम्यान, अध्यक्षांसाठी क्वीन्स गार्डन परिसरातील ‘शिवाई’ हा अधिकृत बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. अध्यक्षांची निवड झाल्यानंतर हा बंगला तात्काळ त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. मात्र, उपाध्यक्षांसह इतर 5पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवासस्थान उपलब्ध नाही. जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधल्यानंतर जुन्या निवासस्थानांचे पाडकाम करण्यात आले होते.

त्यानंतर नवीन निवासस्थाने उभारण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना पुण्यात भाड्याने घर घ्यावे लागणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या भाडे मर्यादेचे बंधन त्यांना पाळावे लागेल. आवश्यकतेनुसार प्रशासनाकडून निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रशासक राजवट सुरू असताना अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची दालने अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वापरात होती. सुमारे एक महिन्यापूर्वी हे अधिकारी आपापल्या मूळ दालनात परतले असून, इतर पदाधिकाऱ्यांची दालनेही पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत. सध्या नवीन खुर्च्या, सोफासेट, पडदे आणि सजावटीच्या कुंड्यांची खरेदी पूर्ण झाली असून, दुरुस्ती, रंगकाम आणि इतर सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी जिल्हा परिषद भवनात जोमदार तयारीचा माहोल निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT