Pune ZP Latest News  Sarkarnama
पुणे

Pune ZP : जुन्नरमध्ये आशा बुचके, देवराम लांडे नशीबवान; तर इतरांना धक्का!

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे.

रवींद्र पाटे

नारायणगाव : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठीची आरक्षण (Reservation) सोडत आज (ता.२८ जुलै) जाहीर झाली. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, शिवसेनेचे (Shivsena) तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे या मातब्बर उमेदवारांचा पत्ता कट झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अनेक नवीन उमेदवारांना संधी मिळणार असून सर्वच राजकीय पक्षांना उमेदवाराचा शोध घेण्याची कसरत करावी लागणार आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी अध्यक्ष देवराम लांडे व भाजपच्या (BJP) माजी जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांच्या मनाप्रमाणे आरक्षण जाहीर झाल्याने त्यांना सलग पाचव्यांदा जिल्हापरिषदेत निवडून जाण्याची संधी निर्माण झाली आहे. असे झाले तर त्यांचा पुणे जिल्हापरिषदेत पाचव्यांदा निवडून जाण्याचा विक्रम असेल. (Pune ZP Election Latest News)

जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचे नऊ गट आहेत. गट निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

नारायणगाव - वारुळवाडी गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग,ओतूर - उंब्रज नंबर १ गट: नागरिकांचा मागास प्रवर्ग , बोरी बुद्रुक - खोडद: अनुसूचित जमाती महिला(महिला) , आळे- पिंपळवंडी गट : अनुसूचित जमाती (महिला), राजुरी- बेल्हे गट : सर्वसाधारण महिला, धालेवाडी- सावरगाव गट : सर्वसाधारण महिला, पाडळी - येणेरे गट : सर्वसाधारण महिला, डिंगोरे- उदापूर गट : सर्वसाधारण, खामगाव- तांबे : सर्वसाधारण

जाहीर झालेल्या आरक्षणानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार व शिवसेनेचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे इच्छुक असलेला बोरी बुद्रुक - खोडद हा गट अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाला आहे. यामुळे निवडणूक रिंगणातून पवार व खंडागळे हे मातब्बर उमेदवार बाहेर पडले आहेत. पवार व खंडागळे यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र आरक्षणामुळे दोघांचा भ्रमनिरास झाला आहे.

आळे- पिंपळवंडी गटाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद लेंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. मागील निवडणुकीत शिवसेनेचे मंगेश काकडे यांचा एक मताने पराभव करून लेंडे विजयी झाले होते. या गटातून काकडे व लेंडे पुन्हा इच्छुक होते. मात्र या गटाचे अनुसूचित जमाती (महिला) आरक्षण जाहीर झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. नारायणगाव-वारुळवाडी गट नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी जाहीर झाला असून कुणबीचा दाखला असलेले नारायणगाव ग्रामपंचायत सरपंच योगेश पाटे, भाजपचे संतोष खैरे, आशिष माळवदकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश मेहेत्रे, दिलीप कोल्हे या गटातून इच्छुक आहेत. या गटाची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

राजुरी- बेल्हे गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके यांचे नाव चर्चेत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या बुचके यांचा धालेवाडी- सावरगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची चिंता दूर झाली आहे. या गटातून इतर पक्ष कोणाला उमेदवारी देतात याकडे लक्ष लागले आहे.

पाडळी - येणेरे गट : सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य पारखे यांच्या पत्नी साधना पारखे यांचे नाव चर्चेत आहे.डिंगोरे- उदापूर गट सर्वसाधारण साठी राखीव झाल्याने या गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांची चिंता दूर झाली आहे. बत्तीस आदिवासी गावे मतदार असलेला खामगाव- तांबे गट सर्वसाधारण जागेसाठी आहे या गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव देवराम मुंढे, माजी आमदार कृष्णराव मुंढे यांचे पुत्र विक्रम मुंढे , आदिवासी नेते दत्ता गवारी यांची नावे चर्चेत आहे. या मुळे या गटाची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT