Pune Zilla Parishad five teachers suspended fake disability certificates sarkarnama
पुणे

Teachers Suspended : पुणे जिल्हा परिषदेचे पाच शिक्षक निलंबित, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई

Fake Disability Certificate Case : जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, प्रमाणपत्रांचा गैरवापर करून बदली आणि अन्य शासकीय सवलतींचा लाभ घेतला होता का? या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे

सरकारनामा ब्यूरो

Pune News : दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची वैद्यकीय फेरतपासणी केल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांच्या पूर्वीच्या प्रमाणपत्रांमध्ये १८ ते ६० टक्के अपंगत्वाची नोंद होती. मात्र, वैद्यकीय फेरतपासणीत हे प्रमाण शून्य ते १० टक्क्यांदरम्यान आढळले आहे.

त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर करून बदली आणि अन्य शासकीय सवलतींचा लाभ घेतला होता का? या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

वैद्यकीय फेरतपासणीत तांदळी (ता. शिरूर) येथील कोमल जालिंदर शिरसाट यांचे पूर्वीचे ५२ टक्के अपंगत्व शून्य टक्के आढळले आहे. मुटकवाडी (ता. खेड) येथील अरुणा विजयकुमार तांबे यांचे अपंगत्व ४२ टक्क्यांवरून एक टक्क्यावर आले आहे.

दरस्तुरवाडी (ता. आंबेगाव) येथील मधुकर महादेव डोंगरे यांचे पूर्वीचे ६० टक्के अपंगत्व आता १० टक्के नोंदविण्यात आले आहे. शिंगवे (ता. आंबेगाव) येथील सुभाष संपतराव इंदोरे यांचे प्रमाण १८ टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर, तर वडकीनाला (ता. हवेली) येथील वाजीदा बादशहा शेख यांचे ४५ टक्के अपंगत्व फेरतपासणीत शून्य टक्के आढळले आहे.

या संदर्भात पाटील म्हणाले, ‘‘शासकीय नियमानुसार दिव्यांग संवर्गातील सवलती आणि विशेष लाभांसाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. मात्र, फेरतपासणीत संबंधित शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळले आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वी दिव्यांग संवर्गातून बदली मिळविण्यासह अन्य शासकीय सवलतींचा लाभ कोणत्या आधारावर घेतला, या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे.

प्रमाणपत्रांच्या आधारे सवलती मिळविण्याच्या प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे.’’

४०९ शिक्षकांनी जोडली होती प्रमाणपत्रे

पुणे जिल्ह्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेदरम्यान ४०९ शिक्षकांनी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांच्या आधारे बदली मिळविण्यात गैरप्रकार झाल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १७६ दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ४६ प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळले होते. त्यानंतर यापैकी ४१ शिक्षकांचे सर्व सेवा-सुविधांचे लाभ काढून घेण्यात आले आहेत. आता वैद्यकीय फेरतपासणीत आणखी पाच शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळल्याने या प्रकरणाला पुन्हा वेग आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT