Vandana Chavan
Vandana Chavan Sarkarnama
पुणे

पुण्याच्या विमानतळाचा प्रश्‍न राज्यसभेत; खासदार चव्हाणांकडून नव्या विमानतळाची मागणी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्याजवळ स्वतंत्र नागरी विमानतळ तातडीने उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण (Vandana Chavan) यांनी आज राज्यसभेत केली. देशाच्या ‘जीएसटी’ संकलनात आघाडीवर असलेल्या पुण्याला दिर्घकाळ नागरी विमानतळाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘ पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे तर देशातील नववे मोठे शहर आहे. गेल्या तीन दशकात पुणे शहराने आयटी, औद्योगिक व अभियांत्रिकी क्षेत्रात आपले वेगळे वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्याच्या जीएसटीमध्ये पुण्याचा वाटा हा २.९२ लाख कोटी इतका आहे. पुण्यात एकूण ८०० महाविद्यालये आहेत. ज्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे पुण्यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र नागरी विमानतळाचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा.’’

खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘‘ सद्यस्थितीला पुण्यातील हवाई वाहतूक ही लोहगाव येथील इंडियन एअरफोर्स स्टेशन येथूनच होत आहे. ज्याची क्षमता प्रतिवर्ष १५ लाख प्रवासी इतकीच आहे. त्यामुळे पुण्याला एका नवीन ग्रीन फिल्ड विमानतळाची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या विषयासाठी संरक्षण मंत्रालय व नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाशी सातत्याने संपर्कात आहेत. मात्र, असे असूनही सदर प्रकल्प हा अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी.’’

पुण्यातील नागरी विमानतळाचा प्रश्‍न गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित आहे. सुरवातीला चाकण परिसरात विमातळाची जागा निश्‍चित करण्यात आली. मात्र, या जागेवर विमानतळाला स्थानिक नेतृत्वाने मोठा विरोध केला. त्यासाठी आंदोलने झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात पुरंदर तालुक्यात विमानतळाची जागा निश्‍चित करण्यात आली. त्याला राज्य व केंद्र सरकारने मंजुरी दिली. भूसंपादनाची तयारीदेखील सुरू झाली. मात्र, राज्यात पुन्हा सत्ता पालट झाल्यानंतर पुरंदरमधील या जागेवरून वाद सुरू झाला. आता नव्याने ही जागा बदलण्याची तयारी सुरू असून त्यावरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. या पाश्‍र्वभूमीवर पवार यांनी गेल्या चार दिवसात केलेली विधाने व खासदार चव्हाण यांनी आज राज्यसभेत केलेली मागणीची भर पडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT