Vasant More, Raj Thackeray
Vasant More, Raj Thackeray sarkarnama
पुणे

वसंत मोरेंना थेट राजसाहेबांचा फोन; नाराजी दूर होणार का?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मंगळवारी (ता. १६) २ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी राज ठाकरे हे पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्याच बरोबर रविवारी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात संदर्भातील आढावा घेणार आहेत. माजी पुणे (PUNE) शहर अध्यक्ष वसंत मोरे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून बेबनाव झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. वसंत मोरे (Vasant More) यांना राज ठाकरे यांनी फोन करुन मंगळवारी सकाळी भेटीसाठी बोलावले आहे.

मशिदीवरील भोंगे काढण्याच्या ठाकरे यांच्या निर्णयानंतर मोरे यांनी उघडपणे विरोध केला होता. त्यानंतर त्यांना तडकाफडकी पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून मोरे हे पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे. रविवारी पुन्हा एकदा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना धक्का दिला. भोंग्यांच्या राजकारणावरून मनसेतच मतभेद निर्माण झाले असून मोरे यांच्या रूपाने पहिला राजकीय बळी गेला आहे. त्यानंतर राज्यातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मोरे यांच्या भूमिकेवरूनही वाद निर्माण झाला. त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्यानंतर त्यांना सातत्याने डावलेले जात असल्याचा आरोप खुद्द त्यांनीच केला आहे.

पक्षाचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नियुक्तीनंतर रविवारी पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. मात्र, या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेतूनच मोरे यांचे नाव वगळण्यात आल्याने पुन्हा वाद वाढला आहे. कोअर कमिटीमध्ये एकूण 11 सदस्य असून त्यापैकी मोरे हे एक आहेत. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत मोरे यांना वगळून दहा जणांची नावे घेण्यात आली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना भेटीसाठी बोलावले आहे.

निमंत्रण पत्रिकेवरील नावा संदर्भात बोलताना मोरे म्हणाले होते, रात्री उशीरा व्हॉट्स अॅपवरून मला कार्यक्रम पत्रिका आली. कार्यक्रम पत्रिकेत दहा जणांची नावे आहेत. प्रत्येकाला विषय दिला आहे. पण माझे नाव नाही. मीही कोअर कमिटीचा सदस्य आहे. पक्षाचा सरचिटणीस आहे. हे जाणीवपूर्वक केले जात आहे, असे मोरे म्हणाले होते. याबाबत शहरातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आहे. राज साहेबांच्या मागे खूप कामे आहेत, असल्या चिल्लर कामांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा टोलाही त्यांनी स्थानिक नेत्यांना लगावला होता. माझ्या पक्षाची पुण्यात ताकद राहावी हे मला वाटते पण पक्षात काही पार्ट टाईम काम करणाऱ्यांना ते वाटत नाही, अशी टीकाही मोरे यांनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT