Raju-Shetty
Raju-Shetty 
पुणे

सत्तेची भाकरी फिरवताना आमचा 'तवा'च गायब झाला : राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला

अनिल सावळे

पुणे  : " गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून सत्तेची  भाकरी फिरवण्याचा विचार केला. परंतु भाकरी फिरवता फिरवता आमचा 'तवा'च गायब झाला," अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला.

आगामी निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करणार, या प्रश्‍नाला उत्तर देताना शेट्टी बोलत होते. सदाभाऊ हे शेट्टी यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जात असत. निवडणुकीनंतर स्वाभिमानीचे सदाभाऊ यांना कृषी राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. परंतु काही महिन्यांतच त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.

 गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकात राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपशी हात मिळवणी  केली होती. त्यामुळे स्वाभिमानीतर्फे सदाभाऊ खोत यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती .

सदाभाऊंच्या भाजपशी वाढत्या जवळीकीने राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात अविश्वास आणि विसंवाद निर्माण झाला . शेवटी सदाभाऊ भपमध्ये डेरेदाखल झाले .

या संदर्भात  राजूशेट्टी  यांनी आपले मत व्यक्त केले . ते म्हणाले ," आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत स्वाभिमानी पक्षाची भूमिका अद्याप ठरलेली नाही. परंतु यापुढे 'तवा' शाबूत ठेवूनच भाकरी फिरवू.".

सदाभाऊ यांनी दूध संघाच्या कारभारावर नुकतीच टीका केली होती. दूध उत्पादकांना योग्य भाव न दिल्यास गुजरात येथील अमूल संघाला दूध खरेदीसाठी परवानगी देऊ, असा इशारा दिला होता.

त्यावर शेट्टी म्हणाले, " शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. तो अमूल दूध संघाने द्यावा की अन्य कोणी द्यावा, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही."

" दूध संस्थांनी हे करावे ते करावे असा सल्ला देण्याची गरज नाही. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, माळावर बोंब मारायला पाटलाची काही परवानगी घ्यावी लागत नाही. ती कोणीही मारू शकतं. अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, सल्ला द्यायची गरज नाही, "असेही शेट्टी यांनी सुनावले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT