Prakash Javadekar Sarkarnama
पुणे

Rajya Sabha Election 2024 : जावडेकर आता काय करणार? शेवटच्या भाषणातच दिले होते संकेत...

Rajanand More

Pune : सलग तीन टर्म राज्यसभेचे खासदार असलेल्या प्रकाश जावडेकरांना भाजपने यावेळी तिकीट नाकारलं आहे. यावेळी पुण्यातून प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जावडेकर हे मोदी सरकारमध्ये मंत्रीही होते. 2021 मध्ये त्यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जावडेकरांवर आता राज्यात कोणती जबाबदारी सोपवली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Rajya Sabha Election 2024)

मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) या पुण्यातील माजी आमदार आहेत. त्यांच्या कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिल्याने त्या नाराज होत्या. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांची नाराजी उघडपणे समोर आली. आता राज्यसभेवर त्यांची वर्णी लावत भाजपने नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुण्यातील जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे मानले जात आहे.

भाजपने कुलकर्णी यांना उमेदवारी देताना जावडेकरांना (Prakash Javadekar) डावलले आहे. जावडेकर हे पहिल्यांदा 2008 मध्ये राज्यसभेवर गेले. त्यानंतर 2014 आणि नंतर 2018 मध्येही त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्याकडे संसदीय कार्य राज्यमंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, पर्यावरण मंत्री आणि मनुष्यबळ विकास मंत्री ही मंत्रिपदं होती. दुसऱ्या टर्ममध्येही त्यांच्याकडे काही काळ मनुष्यबळ विकास आणि पर्यावरण खाते होते. पण 2021 त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जावडेकरांनी प्रवक्ते म्हणून पक्षाचे बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळे त्यांचा दिल्लीत दबदबा होता. आता त्यांच्यावर केरळची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ते केरळ प्रभारी असून सध्या तिथेच आहेत. भाजपकडून आज उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेबाबत सर्वांनाच उत्सुकता होता. अखेर त्यांनी एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हटले आहे जावडेकरांनी?  

मी 1971 च्या रामभाऊ म्हाळगी यांच्या निवडणुकीपासून 53 वर्षे पक्षाचे काम करीत आहे. आज ही करीत आहे. यापुढे ही करीत राहीन. आता मी केरळ निवडणुकीच्या कामासाठी केरळ मध्ये आहे. राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा. भाजपचे सर्व उमेदवार विजय होतील असा विश्वास जावडेकरांनी व्यक्त केला आहे. संसदेमध्ये सहा दिवसांपुर्वीच्या निरोपाच्या भाषणातही त्यांनी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही, याचे संकेत त्यांनी या भाषणातच दिले होते, अशी चर्चा आता रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT