Baramati Protest Rally Sarkarnama
पुणे

सदावर्तेंची जीभ हासडणाऱ्यास ११ लाखांचे, तर बांगड्या भरणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस!

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवास स्थानावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामतीत आज रॅली काढण्यात आली

सरकारनामा ब्यूरो

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याचा आज (ता. १७ एप्रिल) बारामतीतील कामगारांनी रॅली काढून निषेध केला. या वेळी कामगार नेत्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या हल्ल्या प्रकरणी अटकेत असलेले गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांच्यावर अनेकांनी जहाल शब्दांत टीका केली. सदावर्ते यांची जीभ हासडून टाकणाऱ्याला ११ लाखांचे, तर त्यांना बांगड्या भरणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस कामगार नेते तुकाराम चौधर यांनी जाहीर केले. (Rally in Baramati to protest the attack on Sharad Pawar's Mumbai home)

पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर आठवडाभरापूर्वी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांकडून हल्ला झाला होता. त्याच्या निषेधार्थ बारामतीत आज रॅली काढण्यात आली होती. त्या रॅलीत कामगार मोठ्या संख्येने दुचाकीवरून सहभागी झाले होते. शहरातील पेन्सिल चौकापासून ही रॅली निघाली. बारामती तालुका पोलिस ठाण्यासमोर झालेल्या सभेत कामगार नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल करून विरोध केला होता, असे सांगून नानासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात ‘जी व्यक्ती पगारवाढीला न्यायालयात जाऊन विरोध करत असेल तर ती कामगारांच्या हितासाठी काय न्याय मिळवून देईल,’ असा सवाल उपस्थित केला. याच वेळी झालेल्या भाषणात तुकाराम चौधर यांनी वरील घोषणा केली.

तानाजी खराडे, नानासाहेब थोरात, भारत जाधव, नाना बाबर, राहुल बाबर, तुकाराम चौधर, राहुल देवकाते, गुरुदेव सरोदे, खंडू गायकवाड, अनिल वाघ, मनीषा निंबाळकर यांची भाषणे झाली. या रॅलीनंतर पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन देण्यात आले. बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. ते ज्या रस्त्याने जाणार होते, तो रस्ता टाळून कामगारांनी रॅली काढली, त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताणही काहींसा हलका झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT