MLA Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar News : धंगेकरांचं असं झालंय, वर्षपूर्ती विधानसभेची अन् दवंडी पिटताहेत लोकसभेची

Sudesh Mitkar

Pune News : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीला शनिवारी वर्ष पूर्ण झाले आहे. या निवडणुकीपूर्वी नगरसेवक असलेले धंगेकर थेट आमदार झाले. यापूर्वीदेखील धंगेकर यांनी आमदारकी लढवली होती. मात्र, अपेक्षित यश त्यांना मिळाले नव्हते. या वेळी मात्र तीन पक्षांनी ताकद लावली आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जिवावरती धंगेकर आमदार झाले. भरघोस मतांनी निवडून दिलेल्या धंगेकर यांच्याकडून कसब्यातील नागरिकांना खूप अपेक्षित आहे. मात्र, धंगेकर आता आमदारकीचे वर्ष पूर्ण होते ना होते तोच खासदारकीची स्वप्नं पाहू लागले आहेत.

कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पारंपरिक भाजपचा गड असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये धंगेकरांच्या रूपाने काँग्रेसने आपला झेंडा गाडला. या विजयाला शनिवारी वर्ष पूर्ण झाले आहे. या निमित्ताने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत.

या भेटीगाठीमागे निमित्त जरी विधानसभा निवडणुकीच्या विजयाची वर्षपूर्ती असला तरी या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीची पेरणी धंगेकर करताना दिसत आहेत. कसब्याबरोबरच संपूर्ण शहराचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन ते देताना दिसत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी वीस जणांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. मात्र, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे काँग्रेसकडून सध्या जास्त चर्चेत आहेत.

धंगेकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत

यामध्ये धंगेकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. यामुळे आत्मविश्वास वाढलेले धंगेकर मी काँग्रेसचा हिरो आहे, असे सांगून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन हात करायला तयार असल्याचे सांगत आहेत. त्यासोबतच सोशल मीडियातून धंगेकर पॅटर्नचे पोस्टर व्हायरल करून आगामी लोकसभा निवडणुकीमध्येदेखील धंगेकर पॅटर्न राबवणार असल्याची चर्चा घडवून आणत आहेत.

यामुळे धंगेकर हे लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून कसब्यातील प्रश्नांकडे तर दुर्लक्ष करणार नाहीत ना ? अशी काही चिंता कसब्यातील नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे लोकसभेचे स्वप्न बघणाऱ्या धंगेकरांच्या हातातून कसबा पण निसटून तर जाणार नाही ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

R

SCROLL FOR NEXT